संदीप आडनाईककोल्हापूर : करवीर नगरीला दक्षिण काशी अशी धार्मिक ओळख असून, श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या ठिकाणी श्रीकृष्णाच्या नुसत्या येण्याचेच नाही, तर येथे देवकी मातेला कृष्ण बाललीलाही पाहायला मिळाल्या होत्या. त्याची ठिकाणे आजही कोल्हापुरात आढळतात. या सर्वांचे वर्णन कोल्हापूरचे महात्म सांगणाऱ्या करवीर महात्म्य या पवित्र ग्रंथात असल्याची माहिती कोल्हापुरातील मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी माहिती दिलीय.
श्रीकृष्णाबरोबर त्यांना जन्म देणारे देवकी आणि वासुदेवही कोल्हापुरात आले होते. देवकीने श्रीकृष्णाला त्याच्या बाललीला अनुभवण्याविषयीची इच्छा व्यक्त केली, म्हणूनच श्रीकृष्णाने करवीर क्षेत्रात गोकुळ, वृंदावन, मथुरा, द्वारका आदी क्षेत्रांची निर्मिती केली आणि तेथे बाललीलांचे दर्शन माता-पितांना करून दिले, असा श्रीकृष्णाच्या आयुष्यातील प्रसंग करवीर महात्म्य या ग्रंथात आहे. कोल्हापूर ही करवीर काशी आहे, त्याचे महत्त्व श्रीकृष्णाने जाणले होते.
करवीर महात्म्य या संस्कृत ग्रंथात ३६ व्या अध्यायात अगस्ती मुनी आणि लोपामुद्रा यांच्यातील चर्चेमधून कोल्हापूरातील या क्षेत्राचे महात्म्य सांगितलेले आहे. जिल्ह्यातील पन्हाळगड (ब्रह्मगिरी), विशाळगड (मचुकुंदाची गुंफा), गोकुळ शिरगाव (गोकुळ श्रीगाव), वाशी (वसुदेव ग्राम) ही श्रीकृष्णाशी संबंधित असणाऱ्या गावांचा उल्लेख ग्रंथात आढळतो. त्या त्या ठिकाणी श्रीकृष्णाची मंदिरेही पाहायला मिळतात. त्यामुळे करवीर भूमीचे पावित्र्य आणि महत्त्व वाढलेले आहे.
- पन्हाळा : भगवान श्रीकृष्ण हे कालयवनाच्या वधासाठी द्वारकेहून दक्षिणेकडे आले होते. तेव्हा ते करवीर भूमीतील ब्रह्मगिरी पर्वतावर आले होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या आघाताने तो पर्वत खाली दबला गेला. हा ब्रह्मगिरी पर्वत म्हणजेच आत्ताचा पन्हाळा होय. या भौगोलिक घटनेचे देखील वर्णन करवीर महात्म्य ग्रंथात पाहायला मिळते.
- पंचगंगा : करवीर क्षेत्रातील आठ महत्त्वाच्या नद्यांचे महात्म्य आणि त्यांचे खगोलशास्त्रीय वर्णन श्रीकृष्णाच्या मुखातून झाले आहे. भोगावती, पंचनदी, मंदाकिनी, सुनीरा, स्वर्गतरंगिणी, पयोवहा, पापहरा आणि पयोष्णी या आठ नावांचा उच्चार करून पंचगंगेत स्नान केल्यास त्या नरास कधीही नरकाची भीती नाही. असा उल्लेख असलेल्या अगस्तीमुनी आणि लोपामुद्रा यांच्यातील संवादाचे वर्णन या ग्रंथात आहे.
- गोकुळ शिरगाव : कोल्हापुरातील गोकुळ श्रीगाव म्हणजेच गोकुळ शिरगाव हे श्रीकृष्णाच्या करवीर भेटीतील महत्त्वाचे स्थान मानले जाते. मातापित्यांच्या समाधानासाठी, त्यांच्या तृप्ततेसाठी श्री कृष्णाने येथे यमुना नदीचा प्रवाह आणला. तिच्या तीरावर श्रीकृष्णाने आपल्या बाललीलांचे दर्शन घडवले होते. हा डोह आजही पहायला मिळतो. उद्योगनगरी गोकुळ शिरगावच्या पश्चिम दिशेला कृष्णाचे मंदिरही आहे.
- हुतात्मा पार्क : कोल्हापूरच्या मध्यवस्तीतील हुतात्मा पार्क परिसरात उद्यानात पूर्वीच्या जयंती आणि गोमती या नद्यांचा संगम आहे. त्यावर संगमेश्वराचे एक मंदिरही आहे. हे ठिकाण म्हणजेच करवीरची द्वारका मानली जाते.
- गिरगाव : कोल्हापुरातील कळंबापासून पुढे असलेल्या कात्यायनी देवी डोंगरावर असणारे गिरगाव हे ठिकाण म्हणजे श्रीकृष्णाशी संबंधित असणारे करवीर नगरीतील वृंदावन होय. गिरगाव पर्वत म्हणजेच श्रीकृष्णाने आपल्या बोटांवर उचलून धरलेला गोवर्धन पर्वत आहे.
- वाशी : श्रीकृष्णाचे पिता वासुदेवांचे गाव अर्थात वसुदेव ग्राम म्हणजेच कोल्हापुरातील आत्ताचे वाशी होय.
- नंदवाळ : ज्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या अनेक बाललीला घडल्या, ते नंद राजाची राजधानी असलेले नंदग्राम म्हणजेच आत्ताचे नंदवाळ आहे.