कोल्हापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, असा ठराव करावा म्हणून नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६ मार्च रोजी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून मोर्चा निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकटे म्हणाले, दलित महासंघ गेले २९ वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी संघटना असून जहाल आणि आक्रमक आंदोलन केले आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्याबरोबरच अण्णाभाऊ साठे हे या संघटनेचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या विचाराने ही संघटना कार्य करीत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे सांगली येथील वाटेगाव या जन्मगावी आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, या मागणीचा ठराव होण्यासाठी यापूर्वीही आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढला आहे. अण्णाभाऊ साठे यांची गेल्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष झाले असून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याबाबतचा ठराव करण्याची मागणीसाठी राज्यातून साठे प्रेमी मोठ्या संख्येने नाशिकमध्ये जाणार आहेत. पत्रकार परिषदेेला अमोल महापुरे, बाबासाहेब दबडे, पुष्पलता सकटे, जगन्नाथ घोंगडे, आप्पासाहेब कांबळे, अनिल मिसाळ आदी उपस्थित होते.