कोल्हापूर : कोल्हापुरातील अथणे पेंटर कुटुंबीयांकडून शशिकांत अथणे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या राजन सावकर, लक्ष्मण कुबल आणि पंकज गवंडे या तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.मूळचे हालोंडी येथील शशिकांत अथणे १९५७ पासून साईन बोर्डच्या व्यवसायात आहेत. स्टेशन रोडवर १९३६ मध्ये या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आजही ते या व्यवसायात कार्यरत आहेत.शशिकांत अथणे यांच्या इच्छेनुसार दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये फाईन आर्टमध्ये इंटरमीजिएट करणाऱ्या राजन सावकर याला राजलक्ष्मी खानविलकर यांच्या हस्ते, अॅडव्हान्स करणाऱ्या लक्ष्मण कुबल याला माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या हस्ते, तर डिप्लोमा करणाऱ्या पंकज गवंडे या विद्यार्थ्याला चौगुले समूहाचे प्रमुख सुभाष चौगुले यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली. राजलक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.या विद्यार्थ्यांची वार्षिक फी शशिकांत यांची मुले पद्मश्री दवे, जिनेंद्र आणि मदन अथणे हे भरणार आहेत. अथणे कुटुंबीयांमार्फत कॉलेजमधील तीन वर्षांच्या प्रत्येकी एक अशा तीन विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमासाठी राजलक्ष्मी खानविलकर, माजी महापौर शिवाजीराव कदम, चौगुले समूहाचे प्रमुख सुभाष चौगुले, दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, नगरसेवक सत्यजित कदम, विश्वविजय खानविलकर यांच्यासह अथणे कुटुंबीय उपस्थित होते.