१४ व १५ डिसेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी राबविलेल्या वेळी मलकापूर नगरपरिषद हद्दीबाहेरील नागरिकांची मतदार यादीत बोगस नोंद केल्याचे समोर येताच शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीने याबाबत तहसीलदार शाहूवाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती. यावर कारवाई न केल्यास २८ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आघाडीच्यावतीने शाहूवाडी तहसील कार्यालय येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, निवासी नायब तहसीलदार विलास कोळी यांच्यासह पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संबंधित बी .ए. ओ.च्या कामाच्या निरीक्षणाकरिता पर्यवेक्षक म्हणून मलकापूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनस्थळी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, उपसभापती विजय खोत, शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार, माजी सभापती स्नेहा पाटील, जालिंदर पाटील यांनी भेट दिली. या आंदोलनात विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील, नगरसेवक प्रल्हाद पळसे, सुभाष कोळेकर, मानसिंग कांबळे, नगरसेविका संगीता कुंभार, माया पाटील, संगीता पाटील, शालन सोनावळे यांच्यासह माजी नगरसेवक सुधाकर पाटील ,विनायक कुंभार, आदींसह युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.