* चाफवडे येथील बैठकीत उचंगी धरणग्रस्तांचा निर्णय
आजरा : धरणग्रस्तांना मागून मिळत नाही, लढून मिळते हा संघटनेचा इतिहास आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील सर्व धरणग्रस्तांनी संघटित व्हा, असे आवाहन माजी आमदार व धरणग्रस्तांचे नेते श्रीपतराव शिंदे यांनी केले.
चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत ते बोलत होते. पुनर्वसनाचे प्रश्न सोडविल्याशिवाय अधिकाऱ्यांना धरणावर फिरकू द्यायचे नाही व धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात एकजुटीने लढण्याचा निर्धार मंगळवारच्या परिषदेत करण्यात आला.
धरणग्रस्तांच्या व्यथा माजी सरपंच सुरेश पाटील व चाफवडेचे सरपंच विलास धडाम यांनी प्रास्ताविकात मांडल्या. उचंगीच्या धरणग्रस्तांनी सुरुवातीच्या काळात शासनाच्या अधिकाऱ्यांना पळवून लावलेले आहे हा इतिहास आहे. एकजुटीने लढण्याशिवाय पर्याय नाही. धरणग्रस्तांनी संघटित राहावे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे धरणग्रस्तांचे राज्याचे नेते कॉ. धनाजी गुरव यांनी सांगितले.
वशिल्याने धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत. एकजुटीने पुनर्वसन करण्यास भाग पाडूया, असे कॉ. अशोक जाधव यांनी सांगितले. उचंगीच्या शेवटच्या धरणग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सर्व ताकदीनिशी पाठीशी राहणार असल्याचे बाळेश नाईक यांनी सांगितले. धरणग्रस्तांचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी निखराचा लढा करणार असल्याचे कॉ. संजय तर्डेकर यांनी सांगितले.
सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत एकजुटीने लढा उभा करणे व पुनर्वसनाचे प्रश्न सुटल्याशिवाय धरणाचे काम सुरू न करण्याचा निर्धार परिषदेत करण्यात आला.
परिषदेला शंकर पावले, सचिन पावले, आप्पा मणकेकर, संजय भडांगे, धनाजी दळवी, निवृत्ती बापट, दत्तात्रय बापट, रामचंद्र ठाकर, जेऊरचे सरपंच मारुती चव्हाण, चितळेचे जयवंत सरदेसाई यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------
धरणग्रस्तांच्या फुटीचा गैरफायदा अधिकारी व शासनकर्त्यांनी घेतला. मात्र, यापुढे सर्व धरणग्रस्त एकजुटीने लढणार आहोत. धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे कॉ. अशोक जाधव यांनी जाहीर केले.
--------------------------------
धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दहा वेळा अटक झाली तरी तुरुंगात जायची तयारी आहे. ५१ वर्षांत दाढी राखली नाही, पण तुरुंगातील १६ दिवसांत दाढी केली नाही. धरणग्रस्तांना भीती वाटू नये. लढण्याची प्रेरणा मिळण्यासाठी दाढी राखल्याचे आंबेओहोळ धरणग्रस्त कॉ. शिवाजी गुरव यांनी सांगितले.
* फोटो ओळी : चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, अशोक जाधव, संजय तर्डेकर, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २९१२२०२०-गड-१५