पन्हाळगडाच्या पायथ्यालगत मसाई पठाराजवळ हजारो एकर डोंगर भाग आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती, डोंगरचा मेवा व मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या परिसरात वनविभागाने वनतळी तयार केली असल्याने या परिसरात वन्य प्राण्यांचा मोठा वावर असतो. मागील काही महिन्यांपासून या ठिकाणी गव्यांचा कळप वास्तव्य करून आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. या परिसरात काही विघ्नसंतुष्ट लोकांकडून डोंगरांना आग लावली जात असल्याने जैवविविधतेचे मोठे नुकसान होऊ लागलंय. आज लागलेल्या आगीत शेकडो एकरातील डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे झाडवेली व मोठे वृक्ष जळाल्याने पशुपक्ष्यांच्या वास्तव्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. आगीविषयी स्थानिक नागरिकांनी वनविभागाला कळवूनदेखील आग विझविण्यासाठी बराच वेळ कुणीही फिरकले नाही. सोमवारपेठ इंजोळे परिसरातील लोकांनी जीव धोक्यात घालून काही प्रमाणात आग विझविण्याचा प्रयत्न केला, तर मसाई पठाराच्या पूर्व बाजूस आग पुढे सरकत राहिल्याने मोठे नुकसान झाले.
०७ पन्हाळा
मसाई पठाराजवळ डाेंगराला आग लागून नुकसान झाले.