शहरातील रिंगरोडनजीक कुंभार वसाहतीमध्ये इरशाद नदाफ यांच्या गादी कारखान्याला अचानक लागलेल्या आगीत कारखान्यातील साहित्य, संसारोपयोगी वस्तूंसह कारखान्याचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी (१३) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. परंतु, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नदाफ यांचा गादी कारखाना असून कारखान्यानजीक त्यांचे घर आहे. त्यामुळे कारखान्याच्या शेडमध्ये त्यांनी गादीला लागणाऱ्या साहित्यासह संसारोपयोगी साहित्यही ठेवले होते. लॉकडाऊनमुळे कारखान्याचे काम बंद होते.
गुरुवारी दुपारी शेडला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले. नदाफ यांच्यासह शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. परंतु, कापूस, कापड व गादीमुळे सर्व साहित्य, संपूर्ण शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शॉर्टसर्किटमुळेच आग लागली असेल, अशी घटनास्थळी चर्चा होती. अग्निशमन विभागाचे मोहन बारामती, अक्षय पालकर, सोमनाथ हिरेमठ, राहुल कारंडे, सुहास खोत यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी घटनास्थळी भेट देऊन नदाफ कुटुंबाला धीर दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र मांडेकर, नगरसेवक हारूण सय्यद, गुंड्या पाटील आदी उपस्थित होते.
--------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील कुंभार वसाहतीमधील इरशाद नदाफ यांच्या गादी कारखान्याला लागलेली आग. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : १३०५२०२१-गड-०२