कोल्हापूर : आजारी मुलीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिचा मृतदेह नाशिकला घेऊन जाण्यासाठी जवळ पैसे नाहीत. हतबल आई-वडिलांना कोल्हापूरकरांनी मायेचा आधार दिला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून मृतदेह नाशिकला रवाना केला. कोल्हापूरकरांची माणुसकी पाहून मृत मुलीच्या आई-वडिलांनी हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली.
अधिक माहिती अशी, नाशिकचे तुकाराम बळवंत शेवरे, त्यांची पत्नी धोंडाबाई हे विवाहित मुलगी अश्विनी राजेंद्र भगत (वय २५) व नातेवाइकांसह गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर अचानक अश्विनीची प्रकृती बिघडली. त्यांनी तिला पाली येथे रुग्णालयात दाखल केले. तेथून रत्नागिरी येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी नातेवाईक नाशिकला निघून गेले. मुलीच्या सेवेसाठी आई-वडील रुग्णालयात राहिले.
अश्विनीची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी सीपीआरमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. वडील तुकाराम शेवरे यांच्याजवळ पैसे नसल्याने मृतदेह नाशिकला नेण्याचा प्रश्न होता. पती-पत्नी चिंतेत शवगृहाबाहेर बसले होते. बंटी सावंत यांनी विचारपूस केली असता, पैशाअभावी मृतदेह पडून असल्याचे सांगितले. त्यांनी माजी नगरसेवक सुभाष रामगुडे यांना बोलावले. रामगुडे यांनी भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते विजय जाधव यांना फोन करून पालकमंत्र्यांकडून मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या खर्चाची मदत करावी, अशी विनंती केली. जाधव यांनी मंत्री पाटील यांच्याशी बोलून व्यवस्था केली. त्यानंतर दाम्पत्य मृतदेह घेऊन नाशिकला रवाना झाले.