लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : इब्राहिमपूर येथील राजेंद्र तुकाराम मरगाळे व नारायण सगन धामणेकर (रा. बुजवडे, ता. चंदगड) यांच्या पोल्ट्री शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सुमारे ३,४३६ पक्षी व ६९ पोती कोंबडी खाद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे सहा लाखांचे नुकसान झाल्याने हे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. सलग तिसऱ्या वर्षी चंदगड तालुक्याला महापुराचा फटका बसला आहे. इब्राहिमपूर व बुझवडे येथे पुराच्या पाण्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. महापुराचे पाणी पोल्ट्रीत शिरल्याने सुमारे १ व दीड किलो वजनाचे ३,४३६ इतके पक्षी पाण्यात बुडून मृत्यू पावले.
राजेंद्र मरगाळे (इब्राहिमपूर) व नारायण धामणेकर (बुजवडे) या पोल्ट्री व्यावसायिकांचे यामुळे सुमारे ६ लाख १० हजार ६६६ रूपयांचे नुकसान झाले आहे. महापुरामुळे चंदगड तालुक्यातील हे दोन पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. पूर ओसरला असला तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाच्या जखमा भरून निघणे खूप कठीण आहे. शासनाने तातडीने या पोल्ट्री व्यावसायिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
फोटो ओळी : इब्राहिमपूर व बुझवडे (ता. चंदगड) येथील पोल्ट्री शेडमध्ये पुराचे पाणी शिरून पक्षी मृत झाले व कोंबडी खाद्याचेही नुकसान झाले.
क्रमांक : २८०७२०२१-गड-०३