हुपरी : दीनदलित, उपेक्षित, दुर्लक्षित असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य करण्याबरोबरच त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून देण्याची किमया विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे महाविद्यालय, आंबेडकर अकॅडमी सातारा व समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हुपरी (ता. हातकणंगले) येथे आयोजित ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती व विचार’ या विषयावरील दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील होते.ते म्हणाले, अगदी शालेय जीवनापासूनच आंबेडकर यांना अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीस सामोरे जावे लागले होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांना अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या. धर्मांध व कर्मकांडीत सनातनी समाजाबरोबर दोन हात करीत-करीत त्यांनी स्वत:ची एक वेगळी जडण-घडण केली. ज्यांच्या हाती धर्मसत्ता व राज्यसत्ता होती अशांच्या विरोधात प्रखर लढा उभारून दीनदलित, शोषित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकाला समाजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद मोडून काढण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला.ते म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनीही विविध धर्मातील कर्मकांड करणाऱ्या पाखंडी वृत्तीच्या धर्मगुरुंना उघडे पाडण्याचे काम केले आहे. कर्मकांडाबाबत समाजप्रबोधन करून स्वकथित बुद्धिवाद्यांचा थोतांडपणा समाजासमोर आणून त्यांनी प्रत्येक माणसाची किंमत व त्यांचे अस्तित्व संपूर्ण मानवजातीला जाणवून दिले आहे. महिलांमध्ये शैक्षणिक चळवळ जोपर्यंत वाढीस लागत नाही, तोपर्यंत समाज शहाणा होणार नाही, याची जाणीव झाल्याने त्यांनी सन १८४८ साली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्याला धर्मपंडितांनी फार मोठा विरोध केला. चर्चासत्रामध्ये साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना’, प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांची समकालीन प्रस्तुतता : चर्चा व प्रश्नोत्तरे’, झाली. तसेच प्रसाद कुलकर्णी यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मविषयक भूमिका’, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांचे ‘जाती निर्मूलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, डॉ. अशोक चौसाळकर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार’, किशोर बेडकिहाळ यांचे व्याख्यान होणार आहेत. (वार्ताहर)
आंबेडकरांमुळे दीनदलित मुख्य प्रवाहात
By admin | Published: February 11, 2016 12:46 AM