कोल्हापूर : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवार पेठेतील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर विद्यालयास अचानक भेट दिली; तेव्हा त्या ठिकाणी शिक्षक व कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी प्रशासन अधिकाऱ्यांना दिले.आयुक्त कलशेट्टी यांनी देवी रमाबाई आंबेडकर प्रशालामधील लहान मुलांचे फिजिओथेरपी सेंटर व तेथील अंगणवाडी तसेच बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर विद्यालयास शनिवारी अचानकपणे भेट दिली.फिजिओथेरपी येथील मशिनरी व उपलब्ध साधने आयुक्तांनी तपासली तसेच अंगणवाडीच्या लहान मुलांची वजने, उंची तपासली. तेथे असणारे रेकॉर्ड तपासले. लहान मुलांना दिला जाणारा आहार व त्यांना दिली जाणारी खेळणी यांचा आढावा घेतला.
खर्डेकर शाळेत एकामुख्याध्यापकासह तीन शिक्षक व तीन सेवक आहेत. त्यापैकी एकही शिक्षक हजर नव्हता. त्यावेळी आयुक्तांनी तत्काळ प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांना कारवाईचे आदेश दिले.यावेळी स्थानिक नगरसेवक शेखर कुसाळे हे उपस्थित होते. त्यांनी लहान मुलांच्या फिजिओथेरपी सेंटर व अंगणवाडी इमारत धोकादायक झाली असून, ती तत्काळ दुरूस्त करावी, अशी मागणी केली; तसेच दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी सेंटर या भागात चालू करावे, अशी विनंती केली.