कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवासाठी नियमावली तयार केली आहे. यामध्ये दांडिया खेळण्यास मनाई आहे. रस्त्यावर खुदाई करून मंडप उभा करता येणार नाही. देवीच्या मूर्तीसही चार फुटांपर्यंत परवानगी असणार आहे. तसेच मिरवणुकीवरही बंदी असून, तसे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी काढले आहेत.कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी संकट अद्यापही दूर झालेले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नवरात्र उत्सव काही अटी आणि नियम घालून साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवामध्ये ज्याप्रमाणे सहकार्य केले तसेच यावेळीही करावे, असेही म्हटले आहे. विसर्जनावेळी सामाजिक संस्थांनी परिसरात विसर्जन कुंड उभे करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.मंडपासाठी परवानगी लागणारशहरात रस्ते खराब होऊ नयेत म्हणून खुदाई न करता मंडप उभा करावा. काही ठिकाणी ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाईनचे काम सुरू आहे, अशा ठिकाणी मंडप उभा करू नये. मंडळांनी महापालिकेकडून यासाठी रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.महापालिकेचे नियम व अटी
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने उत्सव साजरा करा.
- मंडळांना महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक
- मंडळाची देवीची मूर्ती चार फूट, घरगुती दोन फूट उंचपर्यंत करणे.
- मूर्तीचे विसर्जन घरातच करावे अथवा कृत्रिम विसर्जनस्थळी करावे.
- वर्गणी स्वेच्छेने घ्यावी, मंडप परिसरात आरोग्यविषयक जाहिराती कराव्यात.
- गरबा, दांडिया अशा कार्यक्रमांना बंदी
- आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान घेण्याच्या सूचना
- गर्दी टाळण्यासाठी देवीच्या दर्शनासाठी सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाईन सुविधा करणे.
- मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत मूर्तीचे विसर्जन करावे.
- विसर्जनादिवशी प्रभागनिहाय मूर्ती संकलनाची सुविधा
- मंडपात केवळ पाच कार्यकर्त्यांना प्रवेश
- प्रतिबंधित क्षेत्रातील मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई.
- मोजक्या लोकांमध्येच रावणदहनाचा कार्यक्रम करणे.
- मंडप परिसरात विनापरवाना जाहिरात, फलक, बॅनर्स कमानी उभा केल्यास गुन्हा दाखल.