आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय व अमेरिकेतील नामांकित कॅलिफोर्निया बॅप्टीस्ट विद्यापीठामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर विद्यापीठाच्या ग्लोबल इर्नाशिएटीव्हचे उपाध्यक्ष डॉ. लॉरी लिनामेन व संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे यांनी सह्या केल्या. या विद्यापीठाशी सामंजस्य करार करणारे डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय हे भारतातील पहिले महाविद्यालय आहे. यावेळी बॅप्टीस्ट विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शाखेचे संचालक ब्रायन डेव्हीस, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, प्राचार्य डॉ. ए. एम. मुल्ला, उपप्राचार्य डॉ. एल,आय. वाघमोडे, डॉ. एन. डी. सांगले, प्रशासकीय अधिकारी दीपक अडसूळ, रविकिरण शेफर्ड उपस्थित होते. अॅड. चिमण डांगे व कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई म्हणाले, यापूर्वी या महाविद्यालयाने नॅशनल बोर्ड आॅफ अॅक्रिडीटेशन (एन. बी. ए.) यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त केले आहे. या करारामुळे डांगे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बॅप्टीस्ट विद्यापीठातील विविध शाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविणे सुलभ होणार आहे. तसेच महाविद्यालय व बॅप्टीस्ट विद्यापीठातील प्राध्यापक यांच्यामध्ये परस्पर देवाण-घेवाण होणार आहे. डॉ. लॉरी लिनामेन म्हणाले, डांगे महाविद्यालयातील सोयी-सुविधा, प्राध्यापक वर्ग व संस्थेचा व्यापक दृष्टिकोन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता याचा अभ्यास करून आम्ही डांगे महाविद्यालयाशी सामंजस्य करार केला. ब्रायन डेव्हीस यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. प्रा. आर. ए. कनाई यांनी प्रास्ताविक, डॉ. एन. डी. सांगले यांनी आभार मानले. सुनील शिणगारे, विभागप्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर) विविध शाखांना भेटीडॉ. लॉरी लिनामेन व ब्रायन डेव्हीस यांचा तुतारीच्या निनादात कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. डांगे महाविद्यालयातील विविध शाखांना भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.
डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अमेरिकन बॅप्टीस्ट विद्यापीठाशी करार
By admin | Published: February 15, 2015 11:15 PM