कोल्हापूर : शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याची मोहीम महानगरपालिकेमार्फत मंगळवारपासून सुरू करण्यात आली. बिंदू चौक उपकारागृहासमोरील आझाद गल्लीत असलेल्या जुन्या जामदार वाड्याची धोकादायक इमारत मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने उतरविण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारती बाबत संबंधितांना नोटीस देण्यात आली होती. शहरात एकूण १७० इमारती धोकादायक आहेत, यातील २७ इमारती या न्यायप्रविष्ट आहेत. तर आत्तापर्यंत ५० इमारती उतरविण्यात आल्या आहेत. संबंधित मालकांना रितसर नोटीस बजावून देखील काहींनी आपल्या घराचा धोकादायक भाग काढून घेतला नाही. तसेच नोटिसीची दखलही घेतली नाही.
त्यामुळे मंगळवारी शहरातील बिंदू चौक उपकारागृहासमोरील आझाद गल्लीतील सी वॉर्ड सि.स.नं. ५५४, जामदार वाड्याची धोकादायक इमारत जेसीबीच्या साहाय्याने उत्तरावण्यात आली. ही इमारत राजेंद्र वसंतराव जामदार यांच्या मालकीची होती. इमारत जुनी असल्याने बऱ्याच भागाची पडझड झालेली होती. शिल्लक राहिलेला भाग धोकादायक स्थितीत असल्यामुळे वेळोवेळी नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या.
शहरातील ज्या धोकादायक इमारती आहेत त्या संबंधिकांनी तत्काळ उतरवून घ्याव्यात अन्यथा महापालिका प्रशासनाकडून या इमारतींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
फोटो क्रमांक - १५०६२०२१-कोल-बिल्डिंग
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेने मंगळवारी आझाद गल्लीतील धोकादायक इमारत उतरून घेतली. जुना वाडा असलेल्या या इमारत मालकाला नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली.