कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा बुधवारी सकाळी जोतिबा रोडवरील राजलक्ष्मी यात्री निवास हॉलमध्ये संशयास्पद मृतदेह जुना राजवाडा पोलिसांना मिळून आला. दिलीप ज्ञानदेव कुऱ्हाडे (वय ४८, रा. फडेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल सीपीआर डॉक्टरांकडून प्राप्त झाल्यानंतर नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी सांगितले, दिलीप कुऱ्हाडे हे मंगळवारी ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी आले. दर्शन घेवून ते रात्री जोतिबा रोडवरील राजलक्ष्मी यात्री निवास हॉलमध्ये झोपले. बुधवारी सकाळी ते उठले नाहीत, म्हणून हॉलचा कर्मचारी त्यांना उठविण्यासाठी गेला असता ते निपचित पडल्याचे दिसून आले. याबाबत त्याने जुना राजवाडा पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता ते मृत झाल्याचे दिसून आले. त्यांच्या बॅगेमधील कागदपत्रे व ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवरून नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविला. कुऱ्हाडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
भाविकाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: February 12, 2015 12:10 AM