अणूस्कुरा : दक्षिण शाहुवाडीतील ३५ वाड्यावस्त्यांना शाहूवाडी तालुक्याशी जोडणारा येळवडी ते शाहूवाडी हा अतिशय जवळचा मार्ग आहे. परंतु बॉक्साईड वाहतूक व सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी या रस्त्याला पडलेले भले मोठे खड्डे, रस्त्यावर झालेला निसरडा चिखल, उखडलेली खडी तसेच नालेसफाई, चर मारणे, वळणावरील दिशादर्शक फलक आदी कामांच्या अभावामुळे हा रस्ता समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. या मार्गावर प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
यावर्षी शाहूवाडी ते शिराळे व येळवडी फाट्यापासून येळवडीपर्यंत रस्ता दुरुस्ती व मोऱ्यांचे काम झाले आहे. पण रिंगेवाडीपासून येळवडीपर्यंतच्या रस्त्याची खूपच दूरवस्था झाली आहे. बॉक्साईड कंपनीकडून खड्डे बुजविण्यासाठी मुरुम टाकण्यात आला. मात्र यात मुरूम कमी अन् मातीच जास्त असल्याने पाऊस पडताच चिखल होऊन रस्ता अधिकच निसरडा झाला आहे. परिणामी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुचाकी घसरण्याच्या प्रमाण वाढले आहे. अनेकांना छोट्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या मार्गावर दरवर्षी खड्डे पडतात आणि यावर खर्च होणारा निधीही खड्ड्यातच जातो. मार्गावर पावसाळ्यापूर्वी नाला बंडिंग करणे, रस्त्यावरील पाणी बाहेर काढण्यासाठी चरी खोदणे, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जीर्ण झाडांची विल्हेवाट लावणे ही कामे अग्रक्रमाने व्हायला हवी होती. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. धोकादायक वळणावर दिशादर्शक फलकाचांही अभाव आहे. अस्तरीकरण केलेल्या ठिकाणी खडी उखडली आहे. साईडपट्ट्याचे मजबूत पिचिंग न केल्यामुळे अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अरुंद व वळणाच्या ठिकाणी अपघाताला आमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावर पडलेले खड्डे नीट बुजविणे गरजेचे असताना, त्याकडे दुर्लक्ष तर केले गेले आहे.
चौकट- रिगेवाडी खिंडीत अपघाताची स्थिती:-
"या रस्त्यावर रिंगेवाडी खिंडीत दरड व मोठ मोठे दगड, झाडे ढासळण्याच्या स्थितीत आहेत, दोन्ही बाजूने दरड बांधकाम न झाल्याने, पावसाच्या पाण्याने सतत माती वाहून रस्ता जणू घसरगुंडीच झाली आहे.
०१ शाहूवाडी- करंजफेण रस्ता
फोटो :येळवडी-शाहूवाडी मार्गावरील रिगेवाडी खिंडीत निसरडा झालेला रस्ता.