मार्केट यार्ड : कोरोना संकटाला तोंड देत असतानाच आता शहरातील बहुतांश भागात डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिकांसह प्रशासनापुढे नवे संकट उभे ठाकले आहे. डेंग्यूला आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत असले तरी, शहरातील मोकळ्या जागांवरील अस्वच्छता डेंग्यूसाठी पोषक ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोकळ्या जागांवरील स्वच्छता करण्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. महापालिकेने अनेक भागात सर्वे सुरू केला असून अळ्या आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने साथीच्या आजाराला रोखण्यासाठी धूर फवारणीसह उपाययोजना करण्यात येत असल्या तरी शहरातील खासगी मालकीच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. गेली कित्येक वर्षे या जागांची स्वच्छताच केली नसल्याने तेथे झाडे-झुडपे, कचरा मोठ्या प्रमाणात साठला आहे. अशा जागा डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने संबंधित जागा मालकांना नोटीस पाठवून या जागांची स्वच्छता करण्यास भाग पाडावे, अशी मागणी होत आहे.
मोकळ्या जागांवरील अस्वच्छता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:16 AM