दानोळी : येथे गेल्या वर्षी लोक वर्गणी व जिल्हा परिषद सदस्या शुभांगी शिंदे यांच्या प्रयत्नातून साकारलेले २५ बेडचे कोविड सेंटर पुन्हा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शुभांगी शिंदे व सुकुमार सकाप्पा यांनी दिली. यामुळे दानोळीसह परिसरातील गावांतील कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळणार आहेत.
दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत; पण उपचारासाठी बेड मिळणे अवघड बनले आहे तसेच बाधित रुग्णाला क्वारंटाईन केले जाते, पण त्याची घरामध्ये स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नसल्याने संपूर्ण कुटुंब बाधित होऊ शकते, अशा रुग्णांची या कोविड सेंटरमध्ये सोय करण्यात येणार आहे. यामुळे त्या रुग्णाचे कुटुंब व गावही सुरक्षित राहणार आहे.
या सेंटरमध्ये २५ बेडसह ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असणार आहे तसेच गावातील तज्ज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टज्सह अत्यावश्यक सेवा दिल्या जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुकुमार सकाप्पा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राम शिंदे, उपसरपंच सुनील शिंदे, ॲड. गुरुनाथ माने, उदय राऊत, अमित दळवी, गणेश साळोखे, रामचंद्र वाळकुंजे, रोहित धनवडे, विपुल भिलवडे, ग्रामपंचायत सदस्य व कोविड समितीच्या सहकार्याने सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहे.