दत्तवाड : दानवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी आप्पासो बाबू अंबुपे (वय ६२) यांचा बिबट्यासदृश वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. परिसरातील ही दुसरी घटना आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नवे दानवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी अंबुपे सोमवारी सकाळी दत्तवाड-दानवाड सीमेवर असलेल्या शेतात उसात भांगलण कामासाठी गेले होते. शेतात एकटेच असताना त्यांच्यावर अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नवे दानवाड, टाकळीवाडी, दत्तवाड सीमेवर दावत मलिक दर्गा जमीन आहे. या शेतजमिनीत ही घटना घडली. अंबुपे यांनी वैरण घेऊन मुलाला पुढे पाठवले व नंतर येतो, असे म्हणून सांगितले, पण ते घरी परत आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाने परत शेताकडे जाऊन पाहिले असता अंबुपे यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याने आरडाओरड केल्यावर परिसरातील शेतमजूर धावून आले. नवे दानवाड, टाकळीवाडी, दत्तवाड या तीन गावांच्या सीमेवर शेत आहे. त्यामुळे गावापासून लांब असणाऱ्या या शेतात घटना घडल्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, वनविभागाचे वनपाल घन:शाम भोसले, वनरक्षक गजानन सकट यांनी भेट देऊन पंचनामा करून वन्यप्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले. यावेळी दत्तवाडचे पोलीस पाटील संजय पाटील, प्रकाश तिप्पाणावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट - त्याच वन्यप्राण्याकडून हल्ला?
येथील चिगरे ओढ्यात नवे दानवाड येथील शेतकरी, ग्रामस्थांकडून मृत झालेली लहान-मोठी जनावरे, कोंबड्या याठिकाणी टाकण्यात येतात. त्यामुळे या परिसरात कुत्र्यांचा वावरही मोठा आहे. मात्र, या कुत्र्यांनी माणसांवर यापूर्वी कधीही हल्ला केलेला नाही. मात्र, तीन आठवड्यांपूर्वी लगत असणाऱ्या दत्तवाड हद्दीमध्ये यल्लवा वडर या महिलेवर देखील हल्ला होऊन तिचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हा हल्लादेखील त्याच वन्यप्राण्याने केला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. फोटो - १५०२२०२१-जेएवाय-१०-मृत आप्पासो अंबुपे