कोरोनाच्या महामारीत रस्त्यावर उभे राहून खेळणी, कॅलेंडर, गोळ्या, चिक्की असे विकणाऱ्या अंधांचाही रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकवेळ डोळस व्यक्तींना मदतीची कोणाकडे तरी याचना करण्यासाठी काहीकाळ का असेना बाहेर पडता येते. मात्र, अंधांना दुसऱ्याच्या आधाराशिवाय बाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काही संस्था, संघटना अशा अंधांच्या मदतीकरीता धावल्या आहेत. पण त्यांची मदत तोकडी पडत आहे, अशा वेळी या अंधांना डोळस दातृत्वाकडून मदतीची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात तीन जण पाॅझिटिव्ह
कोरोनाच्या पहिल्या लाटेत एकही अंध पाॅझिटिव्ह झाला नाही. दुसऱ्या लाटेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या लाटेत तीन अंध पाॅझिटिव्ह झाले. मात्र, ते उपचारांनतर सुखरूप आहेत.
विविध संस्थांची मदत
कोल्हापुरात एकूण ३ हजार ५०० हून अधिक अंध व्यक्ती आहेत. त्यापैकी नॅब या संस्थेकडे १६०० जणांची नोंदणी आहे. तर राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघाकडे ३५० जणांची नोंद आहे. तर अन्य जणांची नोंदणी करणे बाकी आहे. यातील बहुतांशी अंध हे विविध ठिकाणी गोळ्या, चिक्की, हातरुमाल, साॅक्स, अगरबत्ती, कॅलेंडर, खेळणी अशा छोट्या छोट्या वस्तू विकून ते आपला उदरनिर्वाह करतात. दुसऱ्या लाटेत नॅबकडून १५० गरजू अंधांना प्रत्येकी १५०० रुपयांचा धनादेश असे तीन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघातर्फे ६० जणांना प्रत्येकी १५ किलोची अन्नधान्याची पॅकेट देण्यात आली आहेत. मात्र, ही मदत तोकडी आहे. त्यामुळे अशा बांधवाकरीता दात्यांनी मदतीचा हात देणे काळाची गरज आहे.
प्रतिक्रिया
मी महाद्वाररोड परिसरात खेळणी, कॅलेंडर फिरून विकतो. त्यातून माझा उदरनिर्वाह काही प्रमाणात होता. मात्र लाॅकडाऊनमुळे मी मिळेल त्या मदतीवर गुजराण करीत आहे.
आशा कांबळे, कोल्हापूर
प्रतिक्रिया
मी अंबाबाई मंदिर परिसरात खेळणी, कॅलेंडर, मास्क आदी छोट्या छोट्या वस्तू फिरून विकतो. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे मला बाहेर जाणे शक्य नाही. मिळेल त्या मदतीवर मी उदरनिर्वाह करीत आहे.
विनोद देवगड, कोल्हापूर
कोट
कोल्हापुरातील अंधांची संख्या आणि आमची मदत ही कमी पडत आहे. दानशूर व्यक्तींनी आमच्या बांधवांना मदत केली तर त्यांचे जगणे सुसह्य होईल. आमच्याकडून साठ जणांना अन्नधान्याची पॅकेट दिली आहेत. त्यांच्या मदतीकरीता दानशूरांना दातृत्व दाखवावे.
- शरद पाटील, महासचिव, राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघ, कोल्हापूर विभाग
कोट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंध सभासदांना मदतीचा हात म्हणून संस्थेकडून गरजू १५० जणांना प्रत्येकी १५०० रुपये असे तीन लाखांची मदत करण्यात आली आहे.
- डाॅ. मुरलीधर डोंगरे, अध्यक्ष, नॅब, कोल्हापूर