सागर गुजर -- सातारा -कोयना धरणातील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. कोयनेचे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी सोडावे, अशी मागणी सांगली जिल्ह्यातून होत आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखविला तर वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवलेले २९.१२ टीएमसी पाणी नदीत सोडावे लागणार आहे, त्यामुळे भविष्यातील वीजनिर्मितीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पातून वर्षाकाठी ३ हजार ३३७ दशलक्ष युनिटस इतकी वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीसाठी दरवर्षी ६७.५० टीएमसी इतके पाणी वापरले जाते. कोयनेच्या लाभक्षेत्रातून पिण्यासाठी व शेतीला सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढू लागल्याने शासनपातळीवर नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वीजनिर्मितीसाठी लागणारे पाणी कमी करून ते ५२.५ टीएमसी इतके करावे, असा निर्णय झाला. वीजनिर्मितीसाठी याआधी ३८.३८ टीएमसी पाणी वापर झालेला आहे. ‘महाजनको’ने नेहमीच्या धोरणानुसार २९.१२ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवले होते. मात्र, या पाण्यालाही आता कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ १४.१२ टीएमसी इतकेच पाणी वीजनिर्मितीसाठी वापरावे लागणार आहे. अर्थात याबाबतचा शासन आदेश झालेला नसला तरीही सांगलीकरांच्या मागणीनुसार धरणातून कोयना नदीत पाणी सोडणे सुरूच ठेवण्यात आले आहे. धरणाची साठवणक्षमता १०५ टीएमसी आहे. मागील पावसाळ््यात पाऊसच अत्यल्प झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. उन्हाळी पावसानेही चकवा दिल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. साहजिकच कोयनेतील वीजनिर्मितीला कात्री बसल्यास राज्याला ऐन उन्हाळ्यात भारनियमनाला सामोरे जाण्याची शक्यता वाढलेली आहे. धरणातील पाणी प्राधान्यक्रमाने पिण्यासाठी सोडले जात असते. उन्हाळा तीव्र असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी सोडावे, अशी सांगली पाटबंधारे विभागाची मागणी आहे. जानेवारी महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीत वीजनिर्मितीवर ६७.०५ टीएमसी पाणी वापराऐवजी ५२.५ टीएमसी पाणी वापरावे, असा निर्णय झाला होता. मात्र, त्याबाबतचे लेखी आदेश काढले गेलेले नाहीत.- वैशाली नारकर,अधीक्षक अभियंता, कोयना धरण विभाग
तहान भागविण्यासाठी अंधार अपरिहार्य!
By admin | Published: April 01, 2016 12:08 AM