कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला, शुक्रवारी कोल्हापुरातील श्री करवीरनिवासिनी अंबाबाईची महासरस्वतीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. करवीरमाहात्म्य ग्रंथातील संदर्भानुसार ही पूजा बांधली असून, यात देवी अगस्ती व लोपामुद्रा यांनी केलेली स्तुती ऐकणाऱ्या महासरस्वतीच्या रूपात सजली आहे.करवीरमाहात्म्य हा ग्रंथ अगस्ती मुनी व लोपामुद्रा यांच्या संवादातून उलगडतो. त्यामुळे आजही अंबाबाईची पालखी घाटी दरवाजाबाहेर दीपमाळेला प्रदक्षिणा घालते, जिथे या दोघांच्याही मूर्ती आहेत. हे मंदिर त्रिकूटप्रासाद म्हणून ओळखले जाते. येथे अंबाबाईसोबतच महाकाली आणि महासरस्वतीचे स्वतंत्र मंडप, गाभारा आणि प्रदक्षिणायुक्त मंदिर आहे.
आज या मंदिरात दक्षिणाभिमुख महाकालीची विराजमान मूर्ती ही चतुर्भूज महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे, जी करवीरची शक्तिपीठ देवता आहे. महाअष्टमीचा होम हिच्यासमोरच होतो; तर महासरस्वतीची मूर्ती ही चतुर्भूज आणि बैठी असून अभय, अंकुश, पाश, वरद अशी आयुधे व मुद्रा धारण करते. या तिघींचेही दर्शन महर्षी अगस्तींनी घेतले होते. ज्या पूजेत अंबाबाई अगस्ती व लोपामुद्रा यांनी केलेली स्तुती ऐकणाऱ्या महासरस्वतीच्या रूपात सजली आहे. ही पूजा पराग ठाणेकर व योगेश जोशी यांनी बांधली.दरम्यान, महाअष्टमीनिमित्त रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती सजविलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणेला निघणार आहे. यंदा कोरोनामुळे हे वाहन सजविलेल्या ट्रॅक्टरमधून नेण्यात येणार आहे.