संदीप आडनाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सिंधुदुर्गातील फोंडा घाटात बुधवारी रात्री वाघाच्या परिवाराचे दर्शन झाले. आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत तीन ते चारवेळा वाघाचे दर्शन झाले आहे. बुधवारी रात्री वाघीण, दोन बछड्यांचे दर्शन झाल्याची माहिती राधानगरी वन्यजीव विभागाचे वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली.
कोकणात चिरा आणण्यासाठी गेलेल्या मडिलगे (जि. कोल्हापूर) येथील एका ट्रकचालकाला बुधवारी (दि. १९ मे २०२१ ) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फोंडा घाटात पूनम हॉटेलच्या वरच्या बाजूस एक वाघीण आणि दोन बछडे दिसले. या चालकाने वाघिणीच्या बछड्याने झाडावर उडी मारतानाचा व्हिडिओ वनविभागाकडे सुपूर्द केला आहे.
आंबोली, दोडामार्ग, तिलारी या जंगल क्षेत्राला गोव्यातील म्हादई अभयारण्य आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्य क्षेत्रही जोडलेले असल्यामुळे वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता विशेषत: वाघांच्या प्रजननाकरिता हा सलग पट्टा उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. राखीव संवर्धन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे वाघांचा हा भ्रमणमार्ग संरक्षित झाला आहे. कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी तसेच तिलारी वन्यजीव अभयारण्याचा परिसर हा 'टायगर कॅरिडॉर'म्हणून ओळखला जातो. २०१४ मध्ये झालेल्या जनगणनेत तीन वाघ असल्याची नोंद आहे.
---------------------------
फोटो : २१-कोल- आंबोली टायगर
फोटो ओळी : आंबोली येथे मार्च २०२१ मध्ये वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेल्या वाघाचे छायाचित्र.