कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिरासह अधिपत्याखाली असलेली सर्व ३०४२ मंदिरे आज, सोमवारपासून सकाळी नऊ ते दुपारी १२ व दुपारी चार ते सायंकाळी सात या सहा तासांसाठी रोज खुली राहणार आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून देवाच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भक्तांना देवदेवतांचे दर्शन घेता येणार आहे. मात्र, भक्तांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली पाळावी लागणार आहे.राज्य शासनाने शनिवारी (दि. १४) राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांच्या दीर्घ काळानंतर भाविकांना करवीरनिवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतीबासह देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेली मंदिरे व आदमापुरातील सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान, नृसिंहवाडीतील दत्तदेवस्थान, बाहुबली येथील महावीर मंदिर, जिल्ह्यातील सर्व मशीद, चर्च, प्रार्थनास्थळे खुली होणार आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्व मंदिरे १८ मार्च २०२० रोजीपासून दर्शनासाठी बंद करण्याचे आदेश दिले होते. मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे सोमवारपासून सुरू होणार आहेत. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंतर्गत असणाऱ्या मंदिरांसह खासगी मंदिरेही सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मंदिर व्यवस्थापनांनी मंदिरासह परिसर निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केला असून, सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
- दर्शन केवळ सकाळी नऊ ते दुपारी १२ व दुपारी चार ते सायंकाळी ७ वाजता या कालावधीत.
- दिवसभरात सहा तास मंदिर खुले राहणार आहे.
- भाविकांसाठी पूर्व दरवाजा (सरलष्कर भवन) येथून प्रवेशरांग असणार आहे
- मंदिरामध्ये कासव चौकातून दर्शन घेऊन दक्षिण दरवाजा (विद्यापीठ हायस्कूल) मार्गे बाहेर जाण्याचे आहे.
- मंदिरात प्रवेश करतानाच भक्तांना ऑटोमेटिक सॅनिटायझर दिला जाणार आहे.
- तापमान तपासणी, आवारात मास्क नसल्यास व मास्क काढून ठेवल्यास दंड आकारला जाणार आहे.
- १० वर्षाखालील व ६५ वर्षांवरील नागरिक आणि गरोदर मातांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
- या पार्श्वभूमीवर देवस्थान कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा उतरविण्यात आला आहे.
- सोमवारी सकाळी ८.३० वाजता यानिमित्त अंबाबाई मंदिरात अष्टाक्षरी शांतिदुर्गा होम
- वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात रुद्र होम व केदार कवच होणार आहे.
- कोरोनाकाळात कार्य केलेल्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, पोलीस, वॉर्डबॉय, आया, आदींना सकाळी ८.३० वाजता दर्शनासाठी प्रथम मान म्हणून देवस्थान समितीने आमंत्रित केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांना अधीन राहून पहिल्या टप्प्यात सकाळी तीन व सायंकाळी तीन असे सहा तास मंदिर खुले राहणार आहे. या कालावधीत रांगेतून प्रवेश करणाऱ्या सर्व भक्तांना दर्शन दिले जाणार आहे. या दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर