कोल्हापूर : विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा,हा सुखसोहळा स्वर्गी नाही...
यंदा मात्र विठ्ठल नामाची शाळा नाही , की टाळ मृदंगाचा गजर, डोईवर वृंदावन घेतलेल्या महिला नाही, भागवत धर्माची पताका घेवून देहभान हरपून जाणारे वारकरी नाही. जणू मंदिरात एकटाच बसून राहिलेला विठूरायाचा भक्तांची वाट पाहतोय.. दुसरीकडे देवाच्या दर्शनाची आस मनातच ठेवून बॅरिकेटच्या पलिकडून कळसाला नमस्कार करुन परतणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे संकट दूर होवू दे आणि तुझी भेट घडू दे असे साकडे घालून बुधवारी आषाढी एकादशीचा दिवस साजरा केला.पंढरीच्या विठ्ठलाची आषाढी एकादशी म्हणजे भागवतधर्माचा मोठा सोहळा. वारकऱ्यांना वर्षभराची ऊर्जा देवाच्या वारीतून मिळते. ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही ते एकादशीला प्रतिपंढरपूर नंदवाळला जातात.याची सुरुवात होते ती कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील पुरातन विठ्ठल मंदिरापासून. दिवसभर येथे भजन, कीर्तनाचा सोहळा रंगतो दिवसभर भाविकांची मांदियाळी असते. प्रसादाचे वाटप होते, वैष्णवांचा मेळा भरतो. तयंदा मात्र कोरोनाने ही वारी तर थांबवलीच पण विठ्ठलाचे दर्शनही घेवू दिले नाही.पहाटे श्रींचा अभिषेक झाल्यानंतर पुजारी मोहन जोशी यांनी सालंकृत पूजा बांधली. खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरापर्यंत जाणारे सगळे रस्ते बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले होते. त्यामुळे मंदिराच्या बाह्य कमानीतून भाविकांनी लाडक्या विठ्ठलाला नमस्कार केला.
देवाची भेट नाही झाली म्हणून काय झालं पण कळसाचे दर्शन घेताना हे संकट दूर होवून तुझी भेट घडो अशी आळवणी भाविकांनी केली. यासह उत्तरेश्वर पेठ, अंबाबाई मंदिर परिसरात शहरातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये देवाचे धार्मिक विधी पार पाडून मंदिर बंद कऱण्यात आले.विठ्ठल रुपात महापूजाआषाढी एकादशीनिमित्त कैलासगडची स्वारी मंदिरात श्रीं ची विठ्ठल रुपात महापूजा बांधण्यात आली. मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजाविधी करण्यात आले.कुंभार मंडपतर्फे दिंडी सोहळाकुंभार मंडप पायी दिंडी सोहळा मंडळाच्या वतीने मार्केट यार्ड येथील विठ्ठल मंदिरापर्यंत सोशल डिस्टंन्स पाळून, टाळ्या वाजवत तसेच मुखी हरीनाम जपत दिंडी काढण्यात आली. मंडळाच्या वतीने दरवर्षी पंढरपूर वारी केली जाते. यंदा वारीचे १२९ वे वर्ष होते. पण कोरोनामुऐ वारी झाली नसली तरी शहरातच दिंडी काढून वारकऱ्यांनी भक्तीचा गजर करत फेर धरला. बापट कैम्प येथील संत गोरोबा कुंभार यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दिंडी समाप्त झाली.सायबा इव्हेंटसतर्फे कोरोना योद्धांचा सन्मानशिवाजी पेठेतील सायबा इव्हेंटसच्यावतीने कोरोना योद्धांचे औक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. सीपीआरमधील कर्मचारी, पोलीस, ट्रॅफिक पोलीस, महापालिकेचे अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. या उपक्रमात साहेबराव काशीद, रेणू पोवार, ओम पोवार, अजूर्न पोवार, सुभाष कोरवी, प्रियांका कुरणे, गणेश खाडे, उदय खाडे उत्तम गुरव यांनी सहभाग घेतला.