कोल्हापूर : माणगाव (जि. सावंतवाडी) येथील कलाकार ऋतिका विजय पालकर हिच्या कलाप्रदर्शनातून ग्रामीण कोकणातील संस्कृतीचे दर्शन कोल्हापूरकरांना घडत आहे. या प्रदर्शनाला राजर्षी शाहू स्मारक भवनमधील कलादालनात रविवारी सकाळी प्रारंभ झाला.या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले. ओरिगामी आर्टिस्ट मंदार वैद्य प्रमुख उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, निसर्गातील दगडांचा योग्य वापर करून साकारलेल्या या कलाकृती लक्षवेधक आहेत. त्यातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते. या प्रदर्शनातून कोल्हापूरकरांना वेगळ्या कलाकृतींचे दर्शन घडणार आहे.
वैद्य म्हणाले, ‘स्टोन आर्ट’द्वारे उत्तम कलाकृती ऋतिका हिने साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकृतीचे वेगळेपण आहे. त्यांना एक ग्रामीण टच आहे. या कार्यक्रमास अॅड. चारूलता चव्हाण, विजय पालकर, श्वेता पालकर, चिन्मय साळोखे, ओंकार पालकर, आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील कला रसिकांनी प्रदर्शन पाहण्यास रविवारी गर्दी केली. हे प्रदर्शन शनिवार (दि. २७) पर्यंत सकाळी १0 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पाहण्यास मोफत खुले राहणार आहे.
स्टोन, पेबल आर्टमधून विविध कलाकृती‘युनिक’ ही संकल्पना घेऊन स्टोन आणि पेबल आर्टचे हे प्रदर्शन कोल्हापुरात मी पहिल्यांदा भरविले आहे. निसर्गातील छोट्या-मोठ्या दगडांचा जो रंग, आकार आहे. ते आहे तसे वापरून त्यातून विविध कलाकृती साकारल्या असल्याचे ऋतिका हिने सांगितले. ती म्हणाली, कोल्हापुरातील या प्रदर्शनात २५ कलाकृतींचा समावेश आहे.
त्यामध्ये गणपती, विठ्ठल, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिरेखा, पाने-फुले, निसर्गाच्या विविध छटा आदींबाबतच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनातून ग्रामीण कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत दिल्ली, मुंबई (गोरेगाव आणि कुलाबा)मध्ये प्रदर्शन भरविली आहेत. कोल्हापूरनंतर पुणे, गोवा येथे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे.