कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे दशरथ तातोबा माने (केर्ले, ता. करवीर) यांची बिनविरोध निवड झाली. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी समिती सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत निवड प्रक्रिया पार पडली.‘जनसुराज्य’चे बाबासाहेब लाड यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्तपदी दशरथ माने यांची निवड झाली. सभेपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सर्वच संचालकांची मते जाणून घेत माने यांचा उमेदवारी अर्ज भरला. माने यांचे नाव सर्जेराव पाटील यांनी सुचविले. त्याला उत्तम धुमाळ यांनी अनुमोदन दिले.
मावळते सभापती बाबासाहेब लाड म्हणाले, सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी कार्यकाळ पार पाडला. मात्र अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करूनही धान्य मार्केट हलवू शकलो नाही, ही खंत आहे. सेसवसुलीसाठी धान्य मार्केटवर नियंत्रण नसल्याने नुकसान होत असून, त्यासाठी पुढाकार घ्या.
नंदकुमार वळंजू, भगवान काटे, कृष्णात पाटील, प्रदीप झांबरे, सदानंद कोरगावकर, किरण पाटील, अमित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. विलास साठे यांनी आभार मानले. सचिव मोहन सालपे, केर्लेच्या सरपंच उषाताई माने, संचालक उपस्थित होते.
माने हे कॉँग्रेसचे करवीर तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहेत. मात्र आतापर्यंत त्यांना जिल्हापातळीवरील पदाची संधी मिळाली नव्हती. सतेज पाटील यांच्यामुळे पहिल्यांदाच संधी मिळाल्याने केर्ले परिसरातून कॉँग्रेस व माने समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या स्नुषा उषाताई माने यांची वर्षाभरापूर्वीच लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली आहे. धनगरी ढोल, हलगीचा कडकडाट आणि फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत त्यांनी जल्लोष केला.