नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने तब्बल दहा दिवसांनी येथील दत्तमंदिर दर्शनासाठी सुरू झाले. चतुर्मास सुरू झाल्याने श्री दत्त मंदिरातील पालखी सोहळा बंद करण्यात आला आहे.कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने १२ जुलैला पहाटे चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला होता. दत्तमंदिरात पाणी आल्याने मंदिर दर्शनासाठी बंद झाले होते. येथील परंपरेनुसार श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली होती.सध्या पावसाने उसंत दिल्याने नदीची पाणी कमी होऊन मंगळवारी येथील दत्तमंदिरात चालू सालातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा झाला. बुधवारी दुपारपासून मंदिरातील पाणी कमी झाल्याने तब्बल दहा दिवसांनंतर श्री दत्तमंदिर दर्शनासाठी सुरू झाले. गुरुपौर्णिमेपासून संन्याशांचा चातुर्मास सुरू होत असल्याने येथे येथील दत्तमंदिरात होणारा पालखी सोहळा बंद झाला आहे. बुधवारी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिर परिसरात नदीचे पाणी असल्याने पाणी कमी झाल्यावर मंदिर परिसरात साठलेला मातीचा गाळ येथील कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करून मंदिर परिसर चकाचक केला.
नृसिंहवाडीतील दत्तमंदिर दहा दिवसांनंतर दर्शनासाठी झाले खुले, पालखी सोहळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 6:48 PM