रुग्ण आधी व कर्मचारी नंतर अशी परिस्थिती दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे. कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष नसल्याने रुग्ण व नातेवाइकांना दत्तवाड ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती झालेली आहे. त्यामुळे रुग्णांमधून संताप व्यक्त होत आहे.
दत्तवाड येथे तालुक्यातील पहिले व सर्वात जुने असे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. रुग्णालयात एका अधीक्षकासह चार डॉक्टर्स, परिचारिका, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, शिपाई असा स्टाफ आहे. सध्या परिचारिका, शिपाई, लिपिक, बालरोगतज्ज्ञ, डेंटिस्ट, सोनोग्राफी मशीन ऑपरेटर या जागा रिक्त आहेत. रुग्णालयाचे कामकाज साडेनऊ वाजता सुरू होते. त्याआधीच रुग्ण व नातेवाईक दवाखान्यात हजर झालेले असतात. मात्र, कर्मचारी अवेळी येतात. त्याचा रुग्णांना व नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकवेळा नातेवाइकांनी टोल फ्री तक्रार नंबरवर तक्रार देखील केली आहे; पण जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. प्रशासनाला कर्मचारी कधी येतात व कधी जातात याचा थांगपत्ता असत नाही.
रुग्णालयात दत्तवाडसह दानवाड, टाकळी, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, घोसरवाड, अकिवाट, हेरवाड या गावांतून रुग्ण येतात. येथील सुविधा व औषधांबद्दल अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी हे रुग्णालय संजीवनी आहे. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती झाली आहे.
--
चौकट - आरोग्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
आरोग्य राज्यमंत्र्यांनी कुरुंदवाड व जयसिंगपूर येथे नवीन रुग्णालयांची घोषणा केली आहे. मात्र, जुन्या रुग्णालयांच्या सुविधेबाबत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोट - कर्मचारी संख्या कमी असल्याचे प्रशासनाला कळविले आहे. औषध पुरवठा व नवीन सोनोग्राफी मशीन याबाबत पत्रव्यवहार झाला आहे. जे कर्मचारी कामचुकारपणा करतात व उशिरा येतात त्यांना नोटीस काढू.
- डॉ. सी. एस. खांबे