दत्तवाड (ता. शिरोळ) येथे गावात अठरा वेगवेगळ्या ठिकाणी मटका व जुगार अड्डा चालतो, तर तीन ते चार ठिकाणी गावठी दारू विक्रीचे अड्डे आहेत. गेल्या आठवड्यातच गावातील मुख्य गांधी चौक व ग्रामीण रुग्णालय चौक येथे कोल्हापूर पोलिसांनी मटका अड्डयावर व जुगार अड्डयावर छापा टाकला. प्रत्येक ठिकाणी मुद्देमालासह चालकाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, या कारवाईनंतर पुन्हा त्याठिकाणी व गावातील सर्व ठिकाणी अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला गावातील अवैध व्यावसायिक समजले जाणारे पांढरा ड्रेस घालून राजकीय व्यासपीठावर वावरताना दिसत आहेत. त्यामुळे छापा टाकलेली कारवाईही पोलिसांची आहे की या व्यावसायिक स्पर्धेतूनच छापा टाकला जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून पांढऱ्या ड्रेसमधले हे व्यावसायिक कारवाईपासून लांब आहेत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करून नक्की यातून काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दत्तवाड हे कर्नाटक सीमेवरील गाव असल्याने गावात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांनी कडक कारवाई करून सर्वच अवैध व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.