उचगाव : उचगाव येथील आरती ज्ञानोबा पाटील या गवंडी कामगाराच्या दिव्यांग मुलीने दुबई येथे पार पडलेल्या पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवत यशाची पताका रोवली आहे. तिची नुकतीच स्पेन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यासाठी तिला दानशूरांच्या मदतीची गरज आहे. पॅरा बॅडमिंटनपटू आरती ही जन्मापासून डाव्या हाताने दिव्यांग आहे. बॅडमिंटनसाठी ती उजव्या हाताचा वापर करते. २९ मार्च ते ४ एप्रिल २१ रोजी दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले आहे. पॅराबॅडमिंटन जागतिक फेडरेशनच्या महिला एकेरी क्रमवारीत ती १४ व्या स्थानावर आहे. याची दखल घेतच तिची स्पेन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारी आरती
सध्या ठाणे (मुंबई) महानगरपालिकेच्या सय्यद मोढी बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे. आतापर्यंत तिने राज्यस्तरीय २ सुवर्णपदके, राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, ४ रौप्यपदके आणि ८ कांस्यपदके जिंकली आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने ३ पदके पटकावली आहेत. २०१९ मधील टोटल बीडब्ल्यूएफ पॅराबॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि जपान पॅराबॅडमिंटन इंटरनॅशनल २०१९ मध्येदेखील ती सहभागी झाली होती.
कोट : माझे वडील व भाऊ गवंडी कामगार आहेत. आई गृहिणी आहे. देश -परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मी चांगली कामगिरी करत आहे; पण प्रत्येक ठिकाणी आर्थिक परिस्थिती आडवी येत आहे. दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक पाठबळ दिले तर नक्कीच मला पुढे चमकदार कामगिरी करता येईल.
-आरती पाटील (पॅराबॅडमिंटनपट्टू)
फोटो :१० आरती जानोबा पाटील