याच सहकारातून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि गोरगरिबांचे संसार फुलविले. त्यांच्या पुढील पिढ्या समृद्ध व्हाव्या म्हणून शिक्षणाची गंगा वाडीवस्तीवर नेऊन नवा माणूस घडविण्याच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले.
तोच वसा अरुण नरके यांनी अत्यंत प्रामाणिकपणे जपला. भारताच्या धवल क्रांतीमध्ये गोकुळने जो अनमोल ठसा उमटवला आहे, त्यामध्ये अरुण नरके यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकाला केंद्रबिंदू मानून काम करत केवळ संस्था आणि संस्थांचे कारभारी मोठे न होता सहकारात सामान्य माणसाला सन्मानाची पत मिळाली पाहिजे ही भावना अरुण नरके यांनी नेहमीच ठेवली. म्हणूनच भारतीय बाजारपेठेला गोकुळ नावाचा शेतकऱ्यांचा कॉर्पोरेट ब्रँड म्हणून आणि अरुण नरके यांची महाराष्ट्राचे वर्गीस कुरीअन म्हणून ओळख निर्माण झाली.
याच कुटुंबातील 'चेतन अरुण नरके ' यांचा पहिल्याच प्रयत्नात गोकुळच्या संचालक मंडळात झालेला प्रवेश, हा देखील नव्या सृजन विचारांचा’ अरुणोदय मानला जात आहे. चेतन यांचा केवळ वारस म्हणून गोकुळ प्रवेश झाला असे चित्र नाही, तर चेतन यांची स्वतःची एक वैचारिक दृष्टी आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, कष्ट करण्याची प्रचंड तयारी, मनमिळावू, विनयशील स्वभाव आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक अर्थव्यवस्था यांचा सखोल अभ्यास या त्यांच्या अत्यंत जमेच्या बाजू आहेत.
चेतन नरके हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांचे शिक्षण बी. ई. इन प्रोडक्शन, एम. एस. कम्प्युटर - (शिकागो - युसए) एमबीए, फायनान्स - ( न्यूयॉर्क - युएसए ) एक्झिक्युटिव्ह एमबीए - (लंडन बिझनेस स्कूल) इतके झाले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करण्याचा गेल्या वीस वर्षांचा अनुभव आहे. २५ हून अधिक देशांचे त्यांनी विविध कंपन्यांद्वारे जागतिक पातळीवर नेतृत्व केले आहे. युरोप आणि आशियाई देशातील एक मान्यवर अर्थ व्यवस्थापक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वदूर प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील उद्योग, अर्थ, कृषी क्षेत्राबरोबरच काॅर्पोरेट क्षेत्रातही काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सध्या ते थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार म्हणूनही काम करत आहेत. त्याशिवाय अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. न्यू एज्युकेशन सोसायटीचे ते मानद संचालक आहेत. अलीकडेच त्यांची राष्ट्रीय स्तरावरील 'IMAT' या संस्थेच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली आहे.
३५ 'अ' मधून बाहेर येणारी युथ डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. यामध्ये चेतन नरके यांच्या याच अनुभवाचा फायदा झाला हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच त्यांच्या हातात आज बँकेचे भविष्य सुरक्षित असल्याची भावना सभासदांच्या मनात निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील महाराष्ट्रातील बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील सर्वांत आशादायी नेतृत्व म्हणून गौरव करत महाराष्ट्रातील इतर सहकारी संस्थांना मदत करण्याविषयी विनंती केली.
त्यांचा गोकुळमधील प्रवेश हा गोकुळ दूध संघाच्या पुढच्या टप्प्यातील जागतिक पर्वाची नांदी ठरेल अशी अपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक करत आहेत. आजवर निर्माण केलेली गोकुळची प्रतिमा येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेचा केंद्रबिंदू ठरावा, अशी त्यांची मनीषा आहे.
दुग्ध उत्पादनात शेतकऱ्याला बांधावर सुद्धा जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान सहज उपलब्ध व्हावे, जागतिक बाजारभाव प्रमाणे शेतकऱ्याच्या दुधाला प्रमाणित भाव मिळावा याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर व्हावा आणि या क्षेत्रातील तरुणाईचा कल वाढवा, यासोबत संकलनात वाढ, मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, स्थानिक सोबत जागतिक स्तरावरील बाजारपेठेचा विस्तार ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे ते सांगतात. 'गोकुळ'सारख्या देशात नावाजलेल्या समूहात संचालक म्हणून त्यांची झालेली निवड ही नरके गटाला राजकीयदृष्ट्या उभारी देणारी बाब आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि आधुनिक दृष्टिकोनाचा फायदा, दूध उत्पादक आणि गोकुळच्या व्यवस्थापनाला नक्कीच होईल. नव्या पिढीशी संधान साधून नवे सृजनशील विचार त्यांच्या रूपाने गोकुळमध्ये राबविले जातील अशी अपेक्षा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने सत्ताधारी आणि विरोधक या गोष्टींचा त्यांच्या कार्यप्रणालीवर नक्कीच फरक पडणार नाही. चेतन नरके यांच्या कल्पक आणि सृजनशील विचारातून गोकुळ दूध संघाला नवचैतन्य प्राप्त होऊन त्यांच्या कर्तृत्वाचा 'अरुणोदय' सहकार आणि कृषी क्षेत्रात होवो याच शुभेच्छा..!
पांडुरंग गांजवे
विक्रम पाटील