कोरोनानं मानवी जीवन उद्ध्वस्त करून टाकलं आहे. सामाजिक जीवनासह उद्योग, व्यवसाय, व्यापार, आरोग्य, शिक्षण इत्यादी बारीकसारीक गोष्टीतही जबरदस्त फटके बसले आहेत. मानसिकता त्यातील क्रूरतेनं हवालदिल झाली आहे.
शासनाने अनेक बाबींवर निर्बंध घातले आहेत. शिक्षणावर घातलेली बंदी फारच दुर्घट. समाजाची, नव्या पिढीची जबरदस्त हानी होतेय. शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, अनेक कोर्सेस चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षण व्यवस्था सुरू केली. आता जूनला शाळा सुरू केल्या, पण त्यात असंख्य अडचणी. अनेक त्रुटी जाणवतात. सर्व थरातील विद्यार्थ्यांना ‘माझी शाळा माझ्या घरात’ मानावं लागलं, पण आर्थिक स्थितीनं फारच कुचंबणा केली आहे. सधनांची मुलं सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने मार्गी लागतात, पण गरीब विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरीही सोयी उपलब्ध करीत चीन, कोरिया, स्वीडन, नेदरलँड, बेल्झियम, कॅनडा, जपान, डेन्मार्क, इटली, अर्जेंटिना, उरुग्वे, स्पेन, फ्रान्स, आफ्रिका, इ. देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय सुरू केला, पण या ऑफलाइन, ऑनलाइन आपला देश स्वीकारता तेव्हा अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात. ही व्यवस्था प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरात उचित साहित्याने परिपूर्ण व्हावी लागते. ठरावीक तास त्या मोबाइल आणि कॉम्प्युटरसमोर स्वत: एकट्याला कोंडून शिक्षणाची पूर्तता करावी लागते. हे तर फारच अवघड. कुणाशी संवाद नाही की संगत नाही. सामुदायिक संवाद हा फार महत्त्वाचा.
कोरोनाचा प्रादुर्भाव चढता वाढताच आहे. त्यामुळं आर्थिक विवंचना जगणं मुश्कील करून टाकते आहे. शिक्षण क्षेत्रात डोकावून पाहाणं धडकी भरवणारं आहे. ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ असं असलं तरी पालकांना त्रस्त करून सोडणारं आलंय. शिक्षणाची गुणवत्ता विकासासाठीचा हेतू मनात धरून ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे, पण बहुतांश पालकांच्या घरी एकच मोबाइल असला तर असतो. एका कुटुंबाकडं नजर टाकली तर आई, वडील, दोन मुलं. ही सारी एकत्रच असतीलच असं नाही. त्यांचा वावर निरनिराळ्या ठिकाणी असतो. त्यामुळं शिक्षण घेणाऱ्या दोन्ही मुलांना मोबाइल कुठून आणायचं? आधीच आर्थिक विवंचनेमुळं हे घडायचं कसं. सर्वांच्या कर्मगती भिन्न ठिकाणी. शिवाय घरात एका जागी एकटंच किती वेळ बसणार? सामुदायिक सहवासात असणं ही गोष्ट फारच महत्त्वाची असते. वेळ निश्चिती हवी तशी नसते. मोबाइल रेंज असेलच असे नाही. दुर्घट ठिकाणी ही गोष्ट तर अवघड.
एकूण शाळा चौदा लक्ष आहेत आणि विद्यार्थी तीस कोटी आहेत आणि विद्यार्थी तीस कोटी आहेत. या साऱ्यांचं एकाच वेळी शिक्षण चालवायचं ही कठीण गोष्ट आहे, पण ते नियतीनं क्रमप्राप्त करून ठेवलंय. ते अनिवार्य आहे. ऑनलाइन शिक्षण, समाजसंस्कृतीला किती अवघड. शाळा जूनमध्ये सुरू होतात. यावेळी शाळा सुरू झाल्या की नाही ते काही कळलंच नाही. नाहीतर एरव्ही शाळा सुरू होण्याचा दिवस पंधरा दिवस पुढं असतानाच त्याचा कालवा काय विचारावा.
परीक्षा संपलेल्या असतात. निकाल लागले जातात. पेढे वाटले जातात. सगळीकडं आनंदी-आनंद झालेला असतो. विद्यार्थीवर्ग बंधनातून मुक्त झालेला असतो. रानामाळात हिंडायला, गावागवंड्यांना फिरायला, इकडं तिकडं हुंदडायला हा सारा पोरंवटा मोकळा झालेला असतो. नदीच्या पात्रात डुंबायला, डोंगरदऱ्यांतून रानमेवा खायला थिरकत असतो.
शाळेला सुट्टी सुरू झाल्यापासून सारे वर्षभराचे ताण-तणाव उतरलेले असतात. सुट्टीत घरच्यांना कामाची मदत करण्यात एक प्रकारचा उत्साह भरलेला असतो. याच काळात केवढा आनंद. अनेक गोष्टींचा अनुभव घ्यायला मिळतो. पाहुण्यापैच्या गावाला जाऊन आलेला असतो. वैशाख वणव्याचा काळ असला तरी सारं मानवी जीवन उत्साहित झालेलं असतं. शिवार पेरणीच्या दिशेनं चाललेलं असतो. पीकं काढलेली असतात. रानमाळ मोकळं झालेलं असतं. शेतीची मशागत चाललेली असते. शाळकरी मुलांना औतावर बसण्यात कोण आनंद मिळतो. मेंढरू, कोकरं पाळण्यात, मळीनं, नदीकाठानं चारायला कोण मजा.