शाळेच्या आधीची सत्र घालमेलीत जाते. अनेक स्वप्नं पडतात. प्रार्थनेपूर्वीच्या मुलांच्या गर्दीची स्वप्नं तर किती गोडगोड. दप्तर बांधून ठेवलेलं असतं. मृग मोहरलेला असतो. पाऊस रिमझिमत असतो. भातं उगवलेली असतात. त्यांच्या छानशा कोळपणी चाललेल्या असतात; पण आज भल्या पहाटेच जाग येते. आवराआवर करायची. आंघोळपाणी करायचं. घाईनं दोन घास पोटात ढकलायचे. पाटी पेन्सिल, दप्तर नीट बघायचं. आईच्या पाया पडायचं. घर विसरलं जातं. शाळा आनंदाची पेरणी करीत असते. जाताना मित्रांच्या घराकडं डोकावायचं. त्यांना हाका मारायच्या. बोलवायचं. संगसंग निघायचं. हसतखिदळत शाळेची वाट धरायची. जिकडून तिकडून दप्तरखाली पोरं येत असतात. कुणी पालक आपल्या बाळाला हाताला धरून येत असतात. शाळेच्या वेळेला गावभर हा असा गलगलाच दांडगा. लहान लहान मुलं रडत असतात. शाळेच्या पटांगणात सगळा दंगाच. सुटी सुरू झाल्यापासून एकमेकांच्या भेटीनं झालेली शाळकरी मुलं एकमेकाला बघून हर्षनिर्भरपणे मिठ्या मारीत असतात. सारं पटांगण भरून जातं. वर्ग शोधत असतानाच शाळेची घंटा खणखणत असते.
प्रार्थना! वर्षातील पहिलीच. गेल्या वर्षभरानंतरची. किती हरवून टाकणारं वातावरण. हा पहिला दिवस म्हणजे सामुदायिक आनंदोत्सवच. नवीन वर्ग. नवीन शिक्षक. नवे नवे भिंतीवरचे तक्ते. सगळा उत्साह दुणावणारा क्षण. थोडी उत्सुकता. थोडं नव्या वर्षाबद्दल आकर्षण. कुणी गैरहजर असेल तर त्याला जिथं असेल तिथून उचलून आणायचं. चार-पाच मुलांचे गट. घर, गाव, वस्त्या शोधल्या जातात. सापडला की त्याची उचलबांगडीच. आमच्या काळचा असा हा शाळेचा पहिला दिवस!
किती उत्सुकता. किती कौतुक. किती लाघवी. सामुदायिक शक्तीचा केवढा उत्सव. नव्या कोऱ्या पुस्तकांचे ते कोरं करकरीत वास. वर्गातल्या मुलांची केवढी नवलाई. गोड बोलणं. गालातल्या गालात हसणं. डोळं मिचकावून बोलणं. गुरुजींनी विचारलेल्या सुटीतल्या गमती. किती किती चैतन्याचा दिवस! आमच्या बालपणी घडत होत्या घटना. शिक्षणाबद्दल गोडी आणि रुची कशी खुशी वाढविणाऱ्या होत्या. आमचा काळ हा असा विस्मयकारक होता. छान होता. चैतन्य निर्माण करणारा होता.
आज काय पाहतोय? कोरोनानं उद्ध्वस्त केलेलं जीवन! ऑनलाइन शिक्षणानं सारंच हरवून टाकलंय. आज गोरगरिबांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी, छोटे-मोठे उद्योग करणाऱ्यांना कशी घ्यायची साधनं. जिथं पोट चालत नाही तिथं शिक्षण कसं चालणार?
सारंच अगतिक झालंय!
सगळंच हतबल झालंय!!
आजच्या जीवनातील आनंदच हरवून गेलाय.
आता तर कोनाची अति भयंकरशी तिसरी लाट येणार आहे, असे म्हणतात.
000