कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला मंगळवारपासून गती मिळाली. हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्सबरोबरच आता ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य व्याधीग्रस्त असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील व्यक्तींनाही आता कोरोना लस दिली जात आहे. त्यामुळे एका दिवसात ६८६ व्यक्तींना ही लस देण्यात आली.
कोल्हापूर शहरातून कोरोनाला हद्दपार करण्याचे प्रयत्न महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधात्मक मोहीम अधिक गतीने राबविली जात आहे. दि. १६ जानेवारीपासून आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तसेच आघाडीवर काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होती. सोमवारपर्यंत ११ हजार कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. मंगळवारपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्षे वयोगटांतील इतर व्याधीग्रस्त व्यक्तींना लस दिली जाऊ लागली आहे.
पहिल्या दिवशी २१५ ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत आरोग्य केंद्रात जाऊन लस टोचून घेतली, तर ४५ ते ५९ वर्षे वयोगटांतील ३३ व्यक्तींनी लस टोचून घेतली. लस घेतलेल्या व्यक्तींना कसलाही त्रास झालेला नसल्याचे महापालिका आयोग्य विभागाने सांगितले.
मंगळवारी झालेले लसीकरण -
- हेल्थ केअर वर्कर पहिला डोस-१९७
-हेल्थ केअर वर्कर दुसरा डोस-१३१
- फ्रंटलाईन वर्कर पहिला डोस-११०
- ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील व्यक्ती-३३
- ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती-२१५
दिवसभरात एकूण लसीकरण-६८६