कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी करायचे दिवस संपले असून, काँग्रेसश्रेष्ठी ज्यांना उमेदवारी देतील त्यांच्या मागे आपण व पी. एन. पाटील ठाम राहू, अशी ग्वाही आमदार महादेवराव महाडिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिका निवडणुकीतील पक्ष विरोधी कामाबाबत कारवाईच करायचे म्हटले, तर जिल्ह्यात आपण सोडून एकही शिल्लक राहणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी महाडिक यांच्यावरील कारवाईबाबत भूमिका स्पष्ट केली. ‘गोकुळ’च्यावतीने ‘वसूबारस’ निमित्त ताराबाई पार्क येथे आयोजित कार्यक्रमानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर फटकेबाजी केली. विधान परिषदेची जागा काँग्रेस पक्षालाच मिळणार असल्याचे सांगत पी. एन. पाटील म्हणाले, आपल्यासह महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे, सतेज पाटील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवाराच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहू. महापालिका निवडणुकीत पक्ष विरोधी भूमिका घेतल्याबद्दल आमदार महाडिक यांच्यावर कारवाई करावी, अशी काँग्रेसचे नगरसेवक मागणी करतात, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण व माजी मंत्री पतंगराव कदम यांनी आपल्याकडे विचारणा केली. पक्षविरोधी काम केल्याबद्दल काँग्रेस पक्षातील नेत्यांवर कारवाई करायची म्हटले तर आपण सोडून एकही शिल्लक राहणार नाही, असे पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. विधान परिषद निवडणुकीबाबत आमदार महाडिक यांना विचारले असता, विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी करायचे दिवस संपले आहेत. काँग्रेसश्रेष्ठी जो उमेदवार देतील व पी. एन. पाटील सांगतील त्या उमेदवाराच्या मागे आपण ठामपणे राहू. यावेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते. कुलूप लावणाऱ्यांवर आधी कारवाई करा ‘गोकुळ’च्या ईर्ष्येवर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘महालक्ष्मी’ दूध संघ काढला, त्याला कुलूप लागले आहे. मयूर दूध संघ बंद आहे. या संस्थांची सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी चौकशी लावून कारवाई करणे अपेक्षित होते; पण चांगल्या चाललेल्या जिल्हा बॅँकेच्या संचालकांना नोटिसा काढल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असणाऱ्या संस्थांच्या थकबाकीपोटी सरकारला नोटिसा काढता येत नाहीत. दादांनी अभ्यास करून कारवाई करावी, असे पी. एन. पाटील यांनी सांगितले.
बंडखोरी करायचे दिवस संपले
By admin | Published: November 08, 2015 12:14 AM