कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील पाणी ओसरल्यानंतर घराकडे तसेच दुकानाकडे धाव घेतलेल्या नागरिकांचा सोमवारचा दिवस गाळ उपसण्यात आणि पाणी बाहेर ढकलण्यातच सरला. सलग तीन वर्षे संकटात असलेल्या पूरग्रस्त शहरवासीयांना आपल्या घरातील प्रापंचिक साहित्य तसेच दुकानातील विक्रीच्या साहित्याचे झालेले नुकसान पाहून गहिवरुन आले.
अवघ्या तीन दिवसात प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पंचगंगा नदीला महापूर आला. एका रात्रीत नदीने धोक्याची पातळी गाठली. तीन दिवसात इतके पाणी येईल याचा कोणालाच अंदाच आला नव्हता. त्यामुळे अनेक नागरिकांना तसेच शहरातील दुकानदार, व्यावसायिकांना आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविता आले नाही. अनेक कुटुंबे तर कपडे आणि अत्यावश्यक साहित्यासह घराबाहेर पडले.
महापुराचे पाणी ओसरल्यानंतर सोमवारी सकाळी निवाराकेंद्रातून वास्तव्यास असलेल्या पूरग्रस्तांनी आपापल्या घराकडे, दुकानाकडे धाव घेतली. महापुराने झालेले प्रापंचिक साहित्य, धान्य, कपडे यांचे झालेले नुकसान पाहून अनेकांची मने हेलावून गेली. अगदी हताश झालेल्या मानाने त्यांनी आपल्या घरातील स्वच्छता मोहीम सुरू केली. अख्खे कुटुंब घरातील गाळ व साचलेले पाणी बाहेर काढत होते. पाण्यात खराब झालेले साहित्य रस्त्यावर आणून टाकत होते. अनेक दुकानदारांनी स्वत: तसेच कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली.
शहरातील अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये महापुराचे पाणी शिरले असून बारा ते पंधरा फूट साचलेले पाणी उपसण्यासाठी मोटारी लावण्यात आलेल्या आहेत. दिवसभर शहरात हे चित्र पहायला मिळाले. पूरग्रस्तांना सावरण्यासाठी पुढील काही दिवस लागणार आहेत.
-महापालिकेमार्फत स्वच्छता-
महापालिका प्रशासनाने पूरग्रस्त भागात सोमवारी तातडीने स्वच्छता मोहीम, औषध फवारणी हाती घेण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुध्दा आपल्या वाहनातून पाण्याच्या फवाऱ्याद्वारे प्रमुख रस्त्यावर साचलेला गाळ बाजूला केला जात होता. शहरात बऱ्याच ठिकाणी असा गाळ साचला आहे.