लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सर्व शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपव्दारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती फोटोसह अपलोड करावी. माहिती अपलोड करण्यास काही अडचण आल्यास तलाठी किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ॲपव्दारे नाेंदणी केली नाही, तर पीक कर्ज, पीक विम्यासह इतर योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार असल्याचे रेखावार यांंनी पत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२१ पासून ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतर्गत शासनाव्दारे ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपव्दारे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पीकपेरणीची माहिती भरण्यासाठी तालुकानिहाय प्रत्येक गावामध्ये तलाठी व कृषी सहायक हे प्रशिक्षक म्हणून नेमले आहेत. हे प्रशिक्षक सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपचा वापर कसा करावा? याविषयी प्रशिक्षण देत आहेत. प्रत्येक गावात तंत्रस्नेही तरुणांचा गटसुध्दा सर्वाना मदत करण्यासाठी बनविण्यात आला आहे.
पूर्वी तलाठी गावामध्ये दवंडी देऊन व प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी करून पिकांच्या नोंदी घेत असत. यानंतर संगणीकृत ७/१२ वर पीक पेऱ्याची नोंदी करण्यात येऊ लागल्या. आता बदलते स्वरूप म्हणून शेतकऱ्यांना स्वतःच स्वतःच्या पिकांच्या नोंदी करण्यासाठी पारदर्शक सुविधा उपलब्ध झाली आहे. यापुढे याच पध्दतीने नोंदी करावयाच्या आहेत. तसेच तलाठी स्वतः पीक पेरा नोंदवू शकणार नाहीत. गाव नमुना १२ अद्ययावत करण्याची ही एकमेव सुविधा उपलब्ध राहणार आहे.
सर्व शेतकऱ्यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी आपल्या शेतातील पिकांच्या नोंदी पूर्ण कराव्यात. या नोंदी शेतकऱ्यांनी न केल्यास पीककर्ज, पीकविमा, ठिबक व तुषार सिंचन आदी लाभापासून वंचित रहावे लागेल, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी पत्रकात म्हटले आहे.