कोल्हापूर : पत्ते खेळण्यास प्रतिबंध केल्याच्या रागातून युवकावर तलवार व स्टम्पने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार कनाननगरात घडला. या हल्ल्यात रोहित हिंदूराव देवकुळे (वय २४, रा. शिवाजी पार्क) हा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ११) रात्री उशिरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी विजय ऊर्फ गदर लमुवेल सकटे (२१, रा. सावंत गल्ली, कनाननगर), अजय रमेश चव्हाण (२०, रा. कनाननगर) यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, तलवार व स्टम्प पोलिसांनी जप्त केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय सकटे व अजय चव्हाण हे दोघे काही मित्रांसोबत कनाननगरातील दोन बत्ती चौक चर्चसमोरील कांडवाळाजवळील रस्त्यावर पत्त्याने खेळत होते. त्यावेळी दिलीप दुधाळे व रोहित देवकुळे तेथे आले. त्यांनी संशयित आरोपीसह इतर मित्रांना तेथे पत्ते खेळत बसण्यास विरोध केला. त्याचा राग मनात धरून दोघाही संशयित आरोपींनी देवकुळे याला धक्काबुक्की केली. त्यामुळे वाद वाढत असतानाच विजय सकट या संशयिताने हातातील लाकडी स्टम्पने रोहित देवकुळे याच्या पाठीत व कमरेवर मारहाण केली. त्यानंतर अजय चव्हाण याने हातातील तलवारीने देवकुळे याच्या डोक्यात सपासप वार करून गंभीर जखमी केले; तसेच तुला जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर जखमी देवकुळे याला नागरिकांनी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी संशयितांची तातडीने धरपकड करून विजय सकटे, अजय चव्हाण या दोघांना शनिवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दि. १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली तलवार, स्टम्प पोलिसांनी जप्त केली.
फोटो नं. १२१२२०२०-कोल-विजय सकटे (आरोपी)
फोटो नं. १२१२२०२०-कोल-अजय चव्हाण (आरोपी)