वारणानगर : शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील संभाजी व्यंकटराव जाधव (वय ५८) या शेतकर्याचा विजेच्या जोरदार धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (शनिवार) रात्री उघडकीस आली. याबाबत माहिती अशी, संभाजी जाधव हे नेहमीप्रमाणे वारणानगर येथील किबिले मळ्यातील शेतात दुपारच्या सुमारास गेले होते. शेतात सायंकाळी पाचपर्यंत मजूरही काम करीत होते. पाचनंतर ऊसपिकाला पाणी देण्यासाठी जाधव मोटारीकडे गेले. तेव्हा जवळ असणारी विजेची केबल हाताने इतरत्र टाकत असता त्यांना विजेचा धक्का बसून ते जागीच कोसळले. ते घरी न आल्याने पुतणे अजित जाधव हे रात्री शेताकडे गेले. त्यावेळी संभाजी हे शेतातील सरीत पडल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती अजित यांनी तातडीने घरी दिली. संभाजी यांना कोडोलीतील उपजिल्हा रुग्णालयात नेले, परंतु ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद रात्री उशिरा कोडोली पोलिसांत झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
विजेच्या धक्क्याने शेतकर्याचा मृत्यू बहिरेवाडीतील घटना : शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता धक्का
By admin | Published: May 12, 2014 12:24 AM