येथील एका उत्कृष्ट कबड्डीपट्टूचा आज कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. फिरोज महंमद मुल्ला (डिगवाडे) असे त्यांचे नाव असून त्यांनी गावामध्ये कबड्डीचा संघ तयार करून विविध स्तरावरील कबड्डी स्पर्धेमध्ये गावाचे नाव उंचावले आहे. कबड्डीमध्ये कधीही हार न पत्करणाऱ्या फिरोज यांना कोरोनाच्या विरोधातील लढाईत मात्र यश मिळवता आले नाही. त्यामुळे गावातील कबड्डीशौकिनांवर शोककळा पसरली आहे.
पट्टणकोडोली गावात कबड्डी हा खेळ लोकप्रिय आहे. येथील चांदी उद्योजक फिरोज महंमद मुल्ला (डिगवाडे) हे गावातील नावाजलेले कबड्डीपटू. फिरोज हे येथील युवक संघटना या कबड्डी टीमचे फेमस खेळाडू होते. त्यांनी आपल्या खेळाने गावाचे नाव उंचावलेच, तर खूप मेहनत घेऊन गावामध्ये अनेक नवीन कबड्डीपटू तयार करण्याचे कामही केले आहे. यातील अनेकांनी राज्यस्तरीय, नॅशनल स्तरावरील विविध कबड्डी स्पर्धेत यश संपादन केले आहे. हे खेळाडू घडवून त्यांनी पोलीस, आर्मी, रेल्वे, तसेच इतर चांगल्या हुद्द्यावर ग्रामीण भागातील मुला, मुलींनी विराजमान व्हावे, अशी त्यांची नेहमीच इच्छा असायची. मात्र, गेल्या आठ दिवसांपूर्वी फिरोज यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. यावेळी फिरोज यांना ही मॅच जिंकता आली नाही. त्यांचा आज कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच कबड्डीप्रेमी आणि खेळाडूंवर शोककळा पसरली. गावातील एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू आणि प्रशिक्षक या कोरोनाने हिरावून नेल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो : फिरोज मुल्ला (डिगवाडे)