कोल्हापूर : उजव्या हाताची शस्त्रक्रिया झालेल्या सहा वर्षांच्या मुलाचा ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी मृत्यू झाला. प्रणव पांडुरंग कांबळे (रा. कळंबा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, खासगी डॉक्टर विलास जाधव यांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला असून, त्यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल करीत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने गोंधळ उडाला. या गोंधळात ‘सीपीआर’च्या शवगृहात मृतदेह तब्बल दहा तास पडून होता. अखेर शाहूपुरी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. मृत मुलाचे वडील पांडुरंग कांबळे यांनी सांगितले, प्रणव हा अंगणवाडीत शिकत घेत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याच्या उजव्या हाताला कुत्रे चावले. शाहूपुरी परिसरातील लहान मुलांच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉ. विलास जाधव यांनी त्याच्यावर उपचार करून कमरेच्या मणक्यातील पाणी काढले. त्याला भूल दिल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ होऊन तो कोमात गेला. त्यामुळे डॉ. जाधव यांनी त्याला ‘सीपीआर’ला हलविण्यास सांगितले. दि. ८ आॅक्टोबर रोजी ‘सीपीआर’ला दाखल केले. चार दिवसांपूर्वी डॉ. जाधव ‘सीपीआर’मध्ये आले. त्यांनी अन्य डॉक्टरांना मुलाला रॅबिज झाल्याचे सांगत त्याला इथे ठेवू नका, दुसरीकडे ठेवा, असे सांगून ते निघून गेले. शुक्रवारी (दि. २१) रात्री त्याच्या उजव्या हाताला सूज आल्याने आॅपरेशन केले आणि शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. मुलाला रॅबिज झाल्याचे निदान डॉ. जाधव यांनी उशिरा सांगितले. त्याच्यावर उपचार करण्यास त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्रणवचा मृतदेह शवगृहात आणण्यात आला. याठिकाणी त्याच्या नातेवाइकांनी गर्दी केली. डॉ. जाधव यांच्याविरोधात तक्रार असून ती दाखल करून घ्या, असे त्यांनी शाहूपुरी पोलिसांना सांगितले. मृत प्रणव हा कळंबा येथील राहणारा, त्याचा मृत्यू ‘सीपीआर’मध्ये झाला. त्यामुळे करवीर पोलिसात वर्दी देण्यात आली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात डॉक्टरविरुद्धच्या तक्रारीची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मृताची नोंद मात्र करवीर पोलिस ठाण्यात झाली. ‘सीपीआर’मध्ये बैठक प्रणव कांबळे याच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी घातलेल्या गोंधळामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तातडीची बैठक घेतली. यावेळी डॉ. विलास जाधव यांनाही बोलाविण्यात आले. जाधव यांनी बैठकीत सांगितले की, प्रणव कांबळे हा खासगी रुग्णालयात दाखल झाला त्यावेळी त्याच्या तोंडावाटे लाळ येत होती, त्याला झटके येत होते. रेबीजची शंका व्यक्त करीत त्याची तपासणी केली असता रेबीजचे निदान झाले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या कमरेच्या मणक्यातील पाणी काढले. त्यानंतर तो ‘कोमा’त गेला. रेबीज झालेला रुग्ण हा हळूहळू कोमात जातो. त्यानंतर त्याला ‘सीपीआर’ला हलविण्यात आले. माझ्याकडून कोणत्याही प्रकारे उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रेबीज झाल्याचे कागदोपत्री रिपोर्टही त्यांनी दाखविले. प्रणव कांबळे हा शाहूपुरीतील एका खासगी रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी दाखल झाला होता. त्याला रेबीज झाल्याने तो कोम्यात गेला होता. रेबीज झाल्यानंतर रुग्ण हा वाचत नाही. त्याची प्रतिकार क्षमता कमी-कमी होऊन मृत्यू होतो. माझा या घटनेशी काहीही संबंध नाही. - डॉ. विलास जाधव
डॉक्टराच्या हलगर्जीपणाने बालकाचा मृत्यू
By admin | Published: October 23, 2016 1:07 AM