समीर देशपांडे -लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर हुपरी येथील १९९४ मध्ये दहावी पूर्ण केलेल्या युवकांनी २० वर्षांनी एकत्र येत ९४ ग्रुपची स्थापना केली. सामाजिक काम सुरू केले. मात्र अचानक एकेदिवशी अपघातात मित्राचा दुर्देवी अंत झाला. अतिरक्तस्त्राव आणि वेळेत रक्त उपलब्ध न झाल्याने त्याचा झालेला मृत्यू मित्रांच्या जिव्हारी लागला. अशी वेळ अन्य कोणावरही येऊ नये यासाठी मित्रांनी निर्धार केला आणि गेली ६ वर्षे त्याच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. आपल्या लाडक्या दिवंगत मित्राला अशा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहण्याचा हा उपक्रम अनुकरणीय आहे. दिवसेंदिवस या उपक्रमामध्ये लोकसहभाग वाढत आहे.
या शिबिराच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या रक्ताचा इतर गरजूंना फायदा होत आहे. एका मित्राच्या अपघाती मृ़त्यूनंतर ही रक्तदानाची परंपरा सुरू झाली आहे. जी समाजाच्या उपयोगाची ठरत आहे. याहीवर्षी रविवार, दि. ३ जानेवारी २०२१ रोजी जिव्हेश्वर भवन, हुपरी येथे या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चौकट
रक्तदात्यांची संख्या
वर्ष २०१७ ६५४
वर्ष २०१८ ८४२
वर्ष २०१९ १०४२
वर्ष २०२० ७५२
चौकट
अन्य सामाजिक कार्य
कोरोनाच्या काळात ९४ ग्रुपचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. ग्रुपच्या सदस्यांनी दोनवेळा हुपरी व आजूबाजूच्या गावांमध्ये औषध फवारणी केली. शिवाय लॉकडाऊनदरम्यान हुपरीच्या सर्व चेकपोस्टवरदेखील तपासणीकरिता योगदान दिले आहे. या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी ग्रुपला कोरोनायोद्धा म्हणून गौरविले. वृक्षारोपण, नेत्ररोग तपासणी, पूरग्रस्तांना व गरजूंना आर्थिक मदत, दुष्काळग्रस्त बांधवांना आर्थिक मदत, जनावरांना चारा पुरवठा, ज्ञानवर्धक सहली आदी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत.
३११२२०२० कोल हुपरी ०१