मोहन सातपुतेउचगाव : जोतिबा देवाच्या श्रद्धेपोटी म्हसवे (ता. भुदरगड) येथील माहेरवाशिनीने आपल्या घरात गाई-म्हशीचा गोठा भरून वाहू दे म्हणून गावच्या नरतवडे (ता. राधानगरी) येथील देवाला एक पाडा (वासरू) सोडले... ते वासरू पंधरा वर्षे गावचे आराध्य दैवत जोतिबांचा वळू म्हणून वावरले. गावाला त्याचा चांगला लळा लागला परंतु कड्यावरून पडून त्याचा नुकताच मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.गावकऱ्यांनी या वळूचे नाव लाडाने कटल्या ठेवलं, तो गावचा राखणदार होता. त्याच्या सहवासाने गावकरी सुखावले होते. गेली पंधरा वर्षे गावकऱ्यांचा साथीदार कटल्या गेल्याने गावात सन्नाटा पसरला. ग्रामदैवत जोतिबा मंदिर परिसरात त्याचा सहवास होता. मृत्यूनंतरही त्याचे दफन मंदिर परिसरात केले. साऱ्या गावकऱ्यांच्या तो काळजाचा तुकडा होता. गेली पंधरा वर्षे त्याने गावाचे संरक्षण केले. गावात कुठेही चोरी झाली नाही अशी गावकऱ्यांची भावना आहे. त्याच्या रुबाबाने भुरळ घातली होती.डोंगरात चरायला गेल्यावर कटल्या कड्यावरून खाली पडला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्याला जेसीबीने बाहेर काढले. चार दिवस उपचारही केले. पण अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्ययात्रेला सारा गाव लोटला होता. मृत्यूनंतर त्याच्या आठवणींनी गावातील आबालवृद्ध, महिलांनी हंबरडा फोडला. मुक्या प्राण्यांच्या प्रेमाने गाव हळवं झालं...
कटल्या म्हणजे गावची शान होता. तो राजासारखा होता. त्याच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी येते. काही गुण व अवगुणांमुळे तो चर्चेत राहिला पण गावकऱ्यांचे त्याने पंधरा वर्षे संरक्षण केलं