आजरा : आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाड्यातील आठ पाळीव देशी गाईंचा अचानक मृत्यू झाला. गाईंच्या अचानक मृत्यूमुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान उद्या सकाळी पशुवैद्यकीय विभागाचे पथक आवंडी धनगरवाड्याला भेट देणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. पुरुषोत्तम ढेकळे यांनी दिली आहे.आवंडी धनगरवाड्यावर प्रत्येक शेतकऱ्यांची २० ते २५ पाळीव गाई असून या धनगरवाड्यावर जवळपास २०० ते २३० गाईंचे पालनपोषण केले जाते. त्यांना जंगलामध्ये चरण्यासाठी सोडले जाते. कालपासून या ठिकाणच्या गाई चरण्यासाठी सोडलेल्या ठिकाणी व रात्री बांधलेल्या ठिकाणी आठ गाई मृतावस्थेत आढळून आल्या. अचानक घडलेल्या घटनेमुळे या ठिकाणचे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली.चालू वर्षी पाऊस नाही व चाऱ्याची उगवणही झालेली नाही. त्यातच उन्हाळ्यातही चाऱ्याची टंचाई. त्यामुळे जंगल परिसरात उगविलेल्या बकऱ्या वनस्पतीचे सेवन या गाईने केल्यामुळे मृत्यू ओढवला आहे असा प्राथमिक अंदाज पशुधन पर्यवेक्षक डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केला आहे.फऱ्या रोगाचे लसीकरणआवंडी धनगरवाड्यावरील सर्व जनावरांचे ३० मे रोजी फऱ्या रोगाचे लसीकरण केले आहे. हे लसीकरण वर्षातून दोन वेळा केले जाते. मात्र बकऱ्या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे अचानक जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. उद्या शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आवंडी धनगरवाड्याला भेट देणार आहे अशीही माहिती डॉ. पुरुषोत्तम ढेकळे यांनी दिली.
कोल्हापूर: ..अन् आजऱ्यातील आवंडीपैकी धनगरवाड्यातील आठ देशी गाईंचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 7:02 PM