कोल्हापूर : राजेश क्षीरसागर यांच्यावर गद्दार म्हणून टीका होत असल्याने ते वैफल्यग्रस्त बनलेत, त्यामुळे ते सहकार्यासह मला व शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे क्षीरसागर, जयवंत हारुगले, उमेश रेळेकर यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शनिवारी मोर्चा काढून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना दिले.मिरजकर तिकटी येथे शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले, मोर्चाने जुना राजवाडा पोलीस स्टेशनवर आले. मोर्चाच्या वतीने शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांची भेट घेऊन कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. शिवसेनेच्या वतीने निवेदन देताना शिष्टमंडळात, जिल्हाध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष सुनील मोदी, हर्षल सुर्वे, रिक्षा सेनेचे अध्यक्ष राजू जाधव, राजू यादव, अवधूत साळोखे, दत्ता टिपुगडे, प्रीती क्षीरसागर आदींचा सहभाग होता.निवेदनात म्हटले, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुवाहाटी येथून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत त्यांनी, तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे, तुला सोडणार नाही अशा पद्धतीने ठार मारण्याची धमकी दिली. विसर्जन मिरवणुकीतील प्रकाराबाबत क्षीरसागर यांनी, मी तेथे असतो तर ठोकले असते, असाही धमकीचा व्हिडिओ प्रसारित केला. बुथसमोर शिवसैनिकांनी गद्दारीबाबत घोषणा दिल्याने क्षीरसागर, जयवंत हारुगले, उमेश रेळेकर हे शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे माझ्या जीवितास धोका असल्याने क्षीरसागरसह तिघांवर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.‘डीजी’ कार्यालयाकडून ‘नियंत्रण’ला संदेशजुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी झाल्याने पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्षात थेट दक्षतेबाबत फोन आला होता.
राजेश क्षीरसागरांकडून ठार मारण्याची धमकी, रवी इंगवलेंची कारवाईची मागणी; पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा
By तानाजी पोवार | Published: September 17, 2022 6:04 PM