लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : जिल्ह्यात करवीर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत दुप्पट मिळत आहे. याचबरोबर कोरोना बाधित रुग्ण दगावण्याची संख्या वाढल्याने आरोग्य विभागापुढे नवे संकट उभे राहिले आहे. दररोज कोरोनाबाधित व कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, ती रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली; पण याची दाहकता शेवटच्या आठवड्यात निर्माण झाली. एप्रिल महिन्यात कोरोना बाधित व त्यातून मृत्यू याची सर्वाधिक संख्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होती.
यानंतर मात्र कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र दिसून येऊ लागले. तालुक्यातील शहरालगतच्या गावांत प्रथम आणि नंतर ग्रामीण भागात अनेक गावे कोरोनाची हॉटस्पॉट झाली. कोरोना वाढीचा दर ग्रामीण भागात मोठा असल्याचे दिसून आले.
करवीर तालुका जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णाची संख्या असणारा तालुका आहे. एप्रिल व मे महिन्यांत कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार २९ वर पोहोचला आहे, तर कोरोनामुळे २११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आजही अनेक गावांत होम क्वारंटाईन झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे. यामुळे प्रत्यक्ष कोरोनाबाधित आकडा आणि प्रत्यक्ष बाधित यात तफावत असल्याचे बोलले जाते. कोरोनाने करवीर तालुक्यातील ९९ टक्के गावांच्या सीमा ओलांडून आत प्रवेश केला आहे. यामुळे कोरोनाबाधितांना उपचार करण्यासाठी बेडही पुरेना झाले. यामुळे खासगी दवाखान्यात रुग्णांची अक्षरशः लूट केली जात आहे.
चौकट
लसीकरण ठप्प
करवीर तालुक्यात लसीच्या तुटवड्याने लसीकरणासाठी लसी उपलब्ध होत नाहीत. यामुळे १८ ते ४४ वयोगटातील जनतेला लसीसाठी चातकाप्रमाणे वाट पाहावी लागत आहे, तर ४५ वर्षांवरील लसीकरण ठप्प झाले आहे.
करवीर तालुक्यात एप्रिल, मे महिन्यांत कोरोनाचा लेखाजोखा
एकूण गावे -- ११८, वाड्या -- १२, लोकसंख्या - ४ लाख ३४ हजार १४८, कोरोनाबाधित -- ६ हजार २९, मृत्यू -- २११.