पांगिरे : वरातीमध्ये डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत असताना डॉल्बीच्या दणदणाटामुळे हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून विशाल नेताजी ठाणेकर (वय २०) या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील विशाल ठाणेकर हा मित्राच्या पाहुण्यांच्या लग्नाला वरातीसाठी सेनापती कापशी येथे गेला होता. लग्नाची वरात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विशाल मित्रांसमवेत उशिरापर्यंत डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत होता. रात्री दीडच्या सुमारास डॉल्बीच्या आवाजामुळे त्याला अस्वस्थ वाटून छातीत कळ येऊ लागली. त्यामुळे त्याने पिंपळगाव येथे जाण्याचा मित्राला आग्रह धरला. रात्री दोनच्या सुमारास दोघे घरी आले व लागलीच घरामध्ये विशाल चक्कर येऊन पडला. त्यास तत्काळ गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. दहा वर्षांपूर्वी विशालवर हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने एक लाख वर्गणी गोळा करून शस्त्रक्रिया केली होती. तेव्हा डॉक्टरांनी काळजी घेण्यास सांगितले होते; पण काल रात्री वरातीतील डॉल्बीचा दणदणाट त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. विशाल ठाणेकर हा गडहिंग्लज येथील डॉ. घाळी कॉलेजमध्ये बी.एस्सी.च्या तृतीय वर्षात शिकत होता. कॉलेजमध्ये हुशार व मनमिळाऊ असल्याने त्याचा मित्रपरिवार मोठा होता. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याचे वडील हे केंद्रशाळा दिंडेवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून नोकरीस आहेत. (वार्ताहर)
डॉल्बीच्या ठेक्यामुळे तरुणाचा मृत्यू
By admin | Published: May 17, 2015 1:12 AM