कोल्हापूर : आण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाची कर्ज प्रकरणे जाणीवपूर्वक नामंजूर करणाऱ्या स्टेट बॅँकेच्या अयोध्या टॉवरमधील विभागीय कार्यालयावर शिवसेनेने धडक मोर्चा काढला. हलगी-घुमक्याच्या गजरात मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅँक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून चांगलेच धारेवर धरले.दुपारी बाराच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर येथून महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार व सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मराठा युवकाला तुच्छ लेखणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्यांचा निषेध असो, मुख्यमंत्र्यांसह महामंडळाने हमी घेऊनही कर्ज प्रकरणे नामंजूर करणाऱ्या बँकेचा निषेध असो, अशा घोषणा देत हा मोर्चा बँकेच्या कार्यालयावर आला. साहाय्यक सरव्यवस्थापक प्रदीप देव उपस्थित नव्हते. त्यांच्या ऐवजी मुख्य व्यवस्थापक बळीराम नाखवा हे शिष्टमंडळाला सामोरे गेले.संजय पवार यांनी मुख्यमंत्री व महामंडळाने कर्जाची हमी घेऊनही तुम्हाला कर्ज प्रकरणे मंजूर करायला काय अडचणी आहेत? अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली. मराठा समाजातील तरुणांना कर्ज द्यायला लाज वाटते काय? परप्रांतीय अधिकाऱ्यांकडून भूमिपूत्र असलेल्या मराठा समाजातील तरुणांना तुच्छतेची वागणूक दिली जात आहे, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला. नाखवा यांनी आमच्या बॅँकेसह शाखाधिकाऱ्यांकडून चुका झाल्या असल्यास त्याबध्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितले.आंदोलनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, रवी चौगुले, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, बाजीराव पाटील, अवधूत साळोखे, विराज पाटील, शशी बिडकर, शुभांगी पोवार, राजेंद्र पाटील, हर्षल सुर्वे, मनजित माने, रणजित आयरेकर, दुर्गेश लिंग्रस, वंदना पाटील, मेघना पेडणेकर, आदींचा समावेश होता.
स्टेट बँकेकडे या महामंडळाची एकूण १६ कर्ज प्रकरणे आली होती. त्यातील बहुतांशी मंजूर झाली असून कागदपत्रांची पूर्तता नसल्याने कांही मंजूरीच्या प्रक्रियेत आहेत. आमच्या बँकेकडे आलेली प्रकरणे तातडीने मंजूर व्हावीत असा प्रयत्न आहे.बळीराम नाखवामुख्य व्यवस्थापक (ग्राहक सेवा)स्टेट बँक विभागीय कार्यालय
पुढील मोर्चा युनियन बॅँकेवरमहामंडळाकडील कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅँकांविरोधात मोर्चे काढण्याची मालिका सुरूच राहणार आहे. पुढील मोर्चा लवकरच युनियन बॅँकेवर काढण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
सुरेश साळोखे शिवसेनेत सक्रीयगेल्या काही वर्षांपासून शिवसेनेपासून अलिप्त असलेले माजी आमदार सुरेश साळोखे पहिल्यांदाच शिवसेनेच्या मोर्चाच्या निमित्ताने सक्रीय झाल्याचे दिसले. ते काही दिवसांतच अधिकृतरीत्या पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.