आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासारखी राज्याची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे ज्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय उभेच राहता येत नाही अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार तयार असल्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कर्जमाफी करावीच लागेल असे ठासून सांगून महसूल मंत्री पाटील म्हणाले‘जो शेतकरी कर्जात बुडालेला आहे, त्याचाच फक्त कर्जमाफीसाठी विचार व्हावा असे सरकारला वाटते. त्यासाठी विरोधकांसमवेत चर्चेला बसण्याची सरकारची तयारी आहे. त्यांनी प्रस्ताव द्यावा सरकार त्यावर जरुर विचार करेल. प्रत्येक गावांतील अशी निकड असलेले शेतकरी किती आहेत,याचा अभ्यास करावा लागेल. ते किती असतील त्याची माहिती घेवून त्यांनाच कर्जमाफी दिली जावी अशी सरकारची भूमिका नाही.
कोणतीही योजना सरसकट सर्वांनाच लाभ देवून राबविण्याची पध्दत रुढ झाली आहे. परंतू आता ते शक्य नाही. कारण राज्याच्या डोक्यावर लाखो कोटींचा कर्जाचा बोजा आहे व हा बोजा सध्या जे संघर्ष यात्रा काढून कर्जमाफी द्या म्हणत आहेत, त्यांनीच करुन ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येवून सरकारसमवेत चर्चा करावी व त्यातून कर्जमाफीचा प्रस्ताव तयार केल्यास सरकार त्यासाठी तयार आहे.
संजय गांधी निराधार अनूदान योजना जशी राबवली जाते, तसा कर्जमाफीचा विचार करावा लागेल.सरसकट कर्जमाफीचा आग्रह धरल्यास त्यातून राज्याचेच नुकसान होईल. तसे केल्यास शेतीसाठी दूरगामी विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध होणार नाही. नुसत्या कर्जमाफीचा विचार न करता शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर आहे.’